मारुती बावडे
निवडणुका नाहीत,नगराध्यक्षपदाचे आरक्षण नाही तरीही अक्कलकोटमध्ये नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. यावरून आगामी काळात दोन्ही पक्षात काटे की टक्कर होणार हे दिसून येत आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट तालुक्यात सक्रिय होण्याच्या मार्गावर आहे. लवकरच या पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणार असल्याने त्यांची भूमिका या निवडणुकीमध्ये काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अक्कलकोट नगरपालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. ही सत्ता कायम राहावी यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी हे प्रयत्न करताना दिसून येत आहेत. या निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्यांचे बंधू मिलन कल्याणशेट्टी यांची युवकांमध्ये मोठी क्रेझ आहे. ते स्वतः याबाबतीत फारसे इंटरेस्ट दाखवत नसले तरी युवकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत मोठी चर्चा आहे. याबाबत आमदार कल्याणशेट्टी यांनी आतापर्यंत कोणतीही वाच्यता केली नाही. यावरून ऐनवेळी नेमके काय घडणार हे देखील पहावे लागेल. यावेळचा मिलन कल्याणशेट्टी यांचा वाढदिवस जंगी करण्यात आला.
दुसरीकडे भाजपमध्येच ज्येष्ठ नगरसेवक महेश हिंडोळे हे देखील ऍक्टिव्ह होताना पाहायला मिळत आहेत.त्यांच्या लॉजिंगच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरातील आपल्या पक्षासह सर्वपक्षीय लोकांना बोलून त्यांनी केलेले शक्ती प्रदर्शन हे बरेच काही सांगून जात आहे. नगराध्यक्ष पदासाठी त्यांची सुप्त इच्छा यापासून काही दूर गेलेले नाही. तेही फिल्डिंग लावून आहेत. गेली अनेक वर्ष तेही भाजपमध्ये कार्यरत आहेत. अजून नगरसेवक बसलिंगप्पा खेडगी गटाची भूमिका ठरलेली नाही ते काय भूमिका घेणार हे देखील महत्त्वाचा असेल. मागच्या निवडणुकीत त्यांनी विक्रमी मतांनी काँग्रेसचा पराभव केला होता.
काँग्रेसमध्ये सध्या तरी ज्येष्ठ नगरसेवक अशपाक बळोरगी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. ते नगराध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यांनी देखील आपल्या घरच्या लग्नामध्ये विविध मान्यवरांना निमंत्रित करून विवाह सोहळा थाटात केला. पूर्ण अक्कलकोट शहरामध्ये त्यांच्या या विवाह सोहळ्याची जोरदार चर्चा होती. योगा योगाने पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विवाह सोहळा झाल्याने त्यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केल्याचे बोलले जात आहे.
तत्पूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भव्य मोटरसायकल रॅली काढून ‘हम भी किसीसे कम नही’ हे दाखवून दिलेले होते. बळोरगी यांचा सर्वधर्मीयांशी चांगला संबंध असल्याने ते काँग्रेसकडून निश्चित मानले जात आहेत. शिवसेनेमध्ये राज्यात जे चाललेले आहे ते अक्कलकोटमध्ये चाललेले आहे. तालुक्यात आता ठाकरे गट आणि शिंदे गट पडलेले आहेत. यात पूर्वीच्या (शिवसेनेचे) ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संजय देशमुख आणि शहर प्रमुख योगेश पवार यांनी राजीनामा दिला आहे. ते मुख्यमंत्री शिंदे गटात गेले आहेत. सध्या राज्यात शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे शिंदे यांच्याकडून त्यांना बळ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिंदे गट उतरण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे ठाकरे गट तालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरे आणि मल्लिनाथ खुबा हे पदाधिकारी झाले आहेत. ते या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार हे पाहावे लागेल. मनसेच्या गोटात तर अद्याप शांतता आहे. राष्ट्रवादीकडून तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे हे काँग्रेस बरोबर युती करण्याच्या तयारीत असून त्यांना समाधानकारक जागांची अपेक्षा आहे. रिपाई आणि रासप भाजपबरोबरच राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र तेही त्यांच्याबरोबर युती करत असताना भाजपकडे अपेक्षित जागांची मागणी करणार असल्याचे बोलले जात आहे. त्या दृष्टीने रिपाई तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे, रासपचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर यांनी आमदार कल्याणशेट्टी यांच्याबरोबर प्राथमिक चर्चा केल्याची माहिती आहे.
सध्या अक्कलकोट शहरात भाजपची सत्ता असल्याने त्यांना रोखण्यासाठी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे जोरदार फिल्डिंग लावत आहेत. काही प्रभागांमध्ये त्यांनी गुप्त बैठका घेऊन तगडे उमेदवार शोधून ठेवले आहेत. ते ऐनवेळी मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी निवडणूकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये आरपारची होणार हे निश्चित झाले आहे.