ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्याचा कार्यभार देवेंद्र फडणवीस चालवतात, संजय राऊतांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक

मुंबई : तुरुंगातून बाहेर येताच संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात अटक केली होती. ‘मला वाटतं की राज्याचा कारभार देवेंद्र फडणवीस हेच चालवत आहेत. ते अनुभवी नेते आहेत’. की मी तुरुंगात असताना राज्य सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले. मी त्या निर्णयांचं स्वागत करतो. विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. राज्यातलं सरकार तेच चालवत आहेत आणि त्यांची लवकरच भेट घेणार आहे, असं यावेळी राऊत म्हणाले.

दरम्यान त्यांना बुधवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यानंतर संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडीतून सुटका झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊतांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. तसेच राऊत म्हणाले की, मी तुरुंगात असताना मला जेव्हा जेव्हा वर्तमानपत्र वाचायला मिळायचं तेव्हा मी याबद्दल माहिती घेत होतो. गरीबांना घरं देण्याचा निर्णय आणि म्हाडाला अधिकार देण्याचा निर्णय हे देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय आहेत. आमच्या सरकारने म्हाडाचे अधिकार काढून घेतले होते ही गोष्ट मला फारशी आवडली नव्हती, असंही राऊत यांनी बोलून दाखवलं.

दरम्यान कामानिमित्त फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेणार असल्याचं राऊत यावेळी बोलताना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!