ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्यात २० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी, प्रशासकीय स्तरावर नियोजन सुरू : तहसीलदार

मारुती बावडे

अक्कलकोट, दि.१० : अक्कलकोट तालुक्यात राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धीकरणानंतर वीस गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकी संदर्भात हालचाली वाढले आहेत प्रशासनाने ही यासंदर्भात काटेकोरपणे नियोजन सुरू केल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी दिली. या टप्प्यात तालुक्यातील २० गावच्या निवडणुका होणार आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणा-या ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला आहे.यात बोरगांव दे., पालापूर, घोळसगांव, सुलतानपूर, अरळी, बोरेगांव, दर्शनाळ, दहिटणेवाडी, शिरवळवाडी, सदलापूर, शिरवळवाडी, कोन्हाळी, हालचिंचोळी, अंकलगे, खानापूर, रुद्देवाडी, आंदेवाडी ज, हत्तीकणवस, सलगर, नाविंदगी या ग्रामपंचायती येत असून याठिकाणी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येणार आहे.

या निवडणूकीत सरपंच पद थेट जनतेतून निवडण्यात येणार आहे.अक्कलकोट तालुक्यातील वीस ग्रामपंचायतीचे एकुण प्रभागाची संख्या ६५ असून एकुण सदस्य संख्या १७२ इतकी आहे. सदर ग्रामपंचायत निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी १३ व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी २६ तसेच, २ निवडणूक निर्णय अधिकारी व ६ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हे राखीव स्वरुपात नेमण्यात आलेले आहेत.

यासाठी निवडणूकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दि.१८ नोव्हेंबर असून नामनिर्देशनपत्र मागविण्याचा व सादर करण्याचा दि.२८ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत

करण्यात आला आहे.अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत आहे.नामनिर्देशन पत्र छाननी ५ डिसेंबर सकाळी ११ वाजल्या पासून छाननी संपेपर्यंत राहणार आहे.

नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दि.७ डिसेंबर दुपारी ३ वाजे पर्यंत राहील.निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिवस हाच राहणार आहे.

मतदानाची तारीख १८ डिसेंबर असून सकाळी ७.३० वाजल्यापासून ते सायं.५.३० वा. पर्यंत मतदान पार पडेल.मतमोजणी व निकाल २० डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येईल,असे तहसीलदार सिरसट यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

निवडणुकीतील गावांचे सहकार्य आवश्यक

महसूल प्रशासनाच्यावतीने पोलीस बंदोबस्त तसेच कर्मचाऱ्यांची संख्या व निवडणुकीसाठी गावाला लागणारे कर्मचारी याबाबत प्रशासकीय स्तरावर नियोजन करण्यात येत आहे.या निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी आम्ही पहिल्या दिवसापासूनच प्रयत्न करत आहोत.निवडणूक लागलेल्या गावातूनही तसे सहकार्य अपेक्षित आहे.

बाळासाहेब सिरसट, तहसीलदार

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!