ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लोकांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी लोकहिताचा अजेंडा राबवण्यास प्राधान्य-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १५ :- आम्ही लोकांसाठी काम करत असून लोकांपर्यंत पोहचणारे हे सरकार आहे. लोकांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी लोकहिताचा अजेंडा राबवण्यास आम्ही प्राधान्य देत आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सकाळ माध्यम समुहाच्या साम मराठी वृत्त वाहिनीतर्फे आयोजित सामर्थ्य महाराष्ट्राचे – वेध भविष्याचा- मंथन विकासाचे या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, साम वृत्तवाहिनीला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत तर सकाळ माध्यम समुह पत्रकारीतेची शतकी वाटचाल करीत आहे. पत्रकारितेसोबतच सामाजिक बांधिलकीतून अनेक अभिनव असे समाजोपयोगी उपक्रम समुहाच्या माध्यमातून राबविले आहेत.

मुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे म्हणाले, राज्याचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे. या ध्येयाला अनुसरुन मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिळून राज्याचा विकासरथ पुढे नेत आहोत. सरकार बदलल्यानंतर थोड्याच कालावधीत लोकांना बदल जाणवत आहे. अल्प कालावधीत जनतेच्या हिताचे निर्णय आम्ही घेतले आहेत. राज्याच्या हिताच्या दृष्टीने मोठे प्रकल्प बाहेर जाणार नाही, याची काळजी आम्ही घेत आहोत. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी राज्यात मोठे प्रकल्प देण्यासाठी आश्वस्त केले आहे. राज्याच्या विकासाला वेग देण्यात केंद्र शासनाचा पाठींबा मिळत आहे.

शेतकरी हा आमच्या शासनाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगून मुख्यमंत्री ‍शिंदे म्हणाले की, पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्यात सेंद्रीय, नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्यात येत आहे. या प्रयत्नात केंद्र शासनाचा चांगला पाठींबा मिळत आहे. शेतकरी आपला अन्नदाता आहे, त्याला सुखी करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यासाठी यावर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकरी बांधवांना आपण भरीव मदत दिलेली आहे. याचप्रकारे परवडणारी घरे, चांगली आरोग्य सेवा मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

आपल्या भारताचे ५ ट्रिलियनची अर्थव्यवस्था उभारण्याचं उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र हा देशाचं ग्रोथ इंजिन असल्यानं यात राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियनपर्यंत नेऊन आपल्याला योगदान द्यायचे आहे. यासाठी मजबूत पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. यात मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, समृद्धी महामार्ग, एमटीएचएल, मेट्रो प्रकल्प असे महत्वाचे प्रकल्प हाती घेतले आहेत. हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी वॉररुमच्या माध्यमातून त्यांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. राज्याच्या सर्वांगीण विकास या ध्येयातून आमचे काम सुरु आहे. या प्रयत्नात लोकांची साथ लाभत आहे. त्यांचा विश्वास जिंकुन राज्याला आम्ही पुढे नेणार असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!