अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना एकूण प्रति टन २ हजार ८०० रुपये भाव मिळावा आणि पहिला हप्ता २ हजार ४०० रुपये असावा, या प्रमुख मागणीसाठी अक्कलकोट तालुक्यातील व्ही. पी. शुगर तडवळ येथील कारखान्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून ऊस दरवाढ झाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा पवित्रा त्यांच्यासोबत असलेल्या शेतकऱ्यांनी घेतला आहे.
जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ,जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या मार्गदर्शनाने २१ नोव्हेंबरपासून हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. कोल्हापूर ३ हजार २००ते ३ हजार ४००, रेणुका शुगर ३ हजार ६५०, सोलापूर जिल्ह्यातील सिध्देश्वर कारखाना २ हजार ६०० पेक्षा जास्त भाव देण्याचे घोषित केले आहे, असे असताना इतर कारखान्यांनी मात्र समाधानकारक भूमिका घेतली नाही. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे, असे बुक्कानुरे यांनी सांगितले.
सध्या चालू असलेल्या आंदोलनाला साखर कारखाना प्रशासन कोणत्याही प्रकारे प्रतिसाद देत नसल्याने शेतकरी बांधवांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे, असेही त्यांनी सांगितले. उपोषणस्थळी अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी बांधव भेट देऊन पाठींबा दर्शवित आहेत. यावेळी जिल्हा उपप्रमुख संतोष पाटील, भीमाशंकर म्हेत्रे, संतोष केंगनाळकर, शहर उपप्रमुख राजु बिराजदार, शरण सुरवसे, युवा सेना तालुका अधिकारी विश्वनाथ कोगनुरे, तालुका संघटक सोपान निकते, शहर प्रमुख मल्लिनाथ खुबा, शहर संघटक स्वामीराव मोरे, तालुका उपप्रमुख राजु गुणापुरे, संतोष रत्नाकर, श्रीशैल स्वामी गुरनिगप्पा पाटील, धनराज चव्हाण, शेतकरी सेना तालुका संघटक हणमंत नागपुरे, किसन राजपुत, मल्लिनाथ पाटील, दर्याप्पा तोळनुरे, बिरू माळगे, बसवराज पुजारी आदींची उपस्थिती होती.