सोलापूर, दि. 19 : कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिल्या.
पालकमंत्री भरणे यांनी कोरोना नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनाबाबत आढावा बैठक घेतली त्यात त्यांनी या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, आदी उपस्थित होते.
श्री.भरणे यांनी सांगितले की, ऑक्सिजनचा पुरवठा नियमित होईल त्याकडे लक्ष द्या. मागणीनूसार वेळीच ऑक्सिजनचा पुरवठा होईल याकडे लक्ष द्यावे. जिल्ह्यात उत्पादित होणारा ऑक्सिजन वैद्यकीय कारणांसाठीच वापरला जाईल याची दक्षता घ्या. त्याचबरोबर ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या टॅकरना विशेष सुविधा मिळेल याची दक्षता घ्या.
सोलापूर शहरातील चाचण्यांची संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे. असे सांगून ते म्हणाले, ग्रामीण भागातील नॉन कोविड रुग्णांना सिव्हील हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी पाठविले जावू नये. ग्रामीण भागातून सिव्हील हॉस्पिटलमध्ये प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांना महानगरपालिकेच्या दवाखान्यात उपचार देण्यात यावेत.
बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले, डॉ.वैश्यंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.शुभलक्ष्मी जयस्वाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार, महापालिकेच्या डॉ.शितलकुमार जाधव, डॉ.एच.प्रसाद, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर, अधीक्षक अभियंता संतोष शेलार, आदी अधिकारी उपस्थित होते.