अक्कलकोट, दि.२८ : सोलापूरच्या उद्योगधंद्यासाठी विमानसेवेची गरज आहेच पण आहे तो चांगला उद्योग बंद पाडून विमानसेवा कशासाठी असा सवाल करत असाच पाठपुरावा जर सर्वांनी बोरामणी विमानतळासाठी केला तर सोलापूरचे निश्चित भले होईल. याबाबतीत अन्याय सहन केला जाणार नाही, अशी भूमिका अक्कलकोट व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मल्लिनाथ साखरे यांनी घेतली आहे. सोलापुरात चिमणीचा विषय तापला असताना अक्कलकोटमधील व्यापाऱ्यांच्यावतीने त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
पुढे ते म्हणाले, राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत सोलापूरचा विचार केला तर सोलापूर मागासलेले आहे त्यातल्या त्यात कारखानदारीमध्ये सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात आहे. विमानसेवेची गरज नाही असे नाही तर व्यापार, उद्योग वाढीसाठी विमानसेवेची गरज आहे. पण याची गरज सोलापुरात उद्योग व्यवसाय आणण्यासाठी आहे ते उद्योग बंद करण्यासाठी नाही,हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.
वास्तविक पाहता बोरामणी विमानतळासाठी मोठी जागा आरक्षित आहे याकडे कोणीच लक्ष देत नाही. त्या ठिकाणी जर भव्य विमानतळ केले गेले तर कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र तीन राज्य जोडली जाऊ शकतात. सोलापूर हे मध्यवर्ती केंद्र होऊ शकते. त्याबाबतीत राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. सर्वांनी मिळून तो विमानतळ जम्बो होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्या उलट नेमके सोलापूरमध्ये घडत आहे. हे चुकीचे असून सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्यावर हजारो जीवनमान अवलंबून आहे. हे कारखान्यातील कुटुंब तर सहन करणारच नाही. पण ज्या पद्धतीने कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी हा कारखाना चालू ठेवला आहे. त्याचा विचार करता सध्या चाललेला प्रकार हा निव्वळ कटकारस्थानाचा प्रकार आहे असेच वाटते. याबाबतीत सर्वांच्या भावना तीव्र आहेत, शासनाने वेळीच लक्ष घालावे, असेही त्यांनी म्हटले आहे.