ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून उजनी पाईपलाईनचे काम गतीने करा

 

 

सोलापूर, दि. 19 : उजनीच्या पाण्याचा विषय हा सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याचा आहे. नागरिक, शेतकरी यांच्या समस्या दूर करून आणि भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून उजनी ते सोरेगावपर्यंतची वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनचे काम गतीने करण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनाला दिल्या.

सोलापूर शहराला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी उजनी धरणातून आणखी एक 110 किमी लांबीची पाईपलाईन मंजूर झाली आहे. ही पाईपलाईन संपूर्ण जमिनीखालून असणार आहे. याबाबतच्या आढावा बैठकीत श्री. भरणे यांनी सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, स्मार्ट सीटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक ढेंगळे-पाटील, भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्यासह स्मार्ट सिटीचे संबंधित सदस्य, अधिकारी उपस्थित होते.

 

श्री. भरणे म्हणाले, पाईपलाईनचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करावे. पाईपलाईन जमिनीखालून असल्याने शेतकऱ्यांचे जास्त नुकसान होणार नाही. त्यांना त्या जमिनीवर सर्व पिके घेता येणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी पाईपलाईनसाठी अडवणूक करू नये.

 

पाईपलाईन माढा, मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यातून जात असून यात 35 गावांचा समावेश आहे. 138 हेक्टरच्या वापर हक्कासाठी भूसंपादनाचे काम सुरू आहे. 35 पैकी 34 गावातील मोजणीचे कामही झाले आहे. बाधित जमिनीवरील वृक्ष, शेती, घरे यांचे पंचनामे व मूल्यांकन करण्याचे काम त्वरित सुरू होत असल्याची माहिती श्री. सूर्यवंशी यांनी दिली.

 

सोलापूर महापालिकेने फेब्रुवारी 2020 रोजी राज्य शासनाला प्रस्ताव पाठविला असून त्यानुसार शासनाकडून वापर हक्काच्या संपादनाचा इरादा राजपत्राद्वारे प्रसिद्ध होणे बाकी आहे. राजपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर पुढच्या 21 दिवसात बाधित खातेदारांच्या लेखी हरकती घेऊन 30 दिवसात हरकतीवर सुनावणी होऊन निर्णय दिला जाणार आहे.

 

यावेळी स्मार्ट सिटीचे श्री. ढेंगळे -पाटील यांनी पाईपलाईनबाबतच्या अडचणी मांडल्या. स्मार्ट सिटी अंतर्गत विविध कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला. शहरातील उड्डाणपूल, स्ट्रीट लाईट, आयलँड, ई-टॉयलेट, हुतात्मा बाग, कचरा ट्रान्सफर स्टेशन, होम मैदान, डिपार्टमेंट गार्डन, इंदिरा गांधी स्टेडिअम, सिद्धेश्वर तलावाभोवती ट्रॅकिंग, लक्ष्मी मार्केट, सोलर सिस्टीम आदी कामांचाही आढावा घेण्यात आला. ही कामेही गतीने करण्याच्या सूचना श्री. भरणे यांनी दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!