मुंबई : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांचे बुधवारी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र आज त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. इ.स. १९७७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यानंतर ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख बनले. २००५ पासून २०१०पर्यंत कोतापल्ले मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते.
नॅक, राज्य मराठी विकास संस्था, साहित्य अकादमी, राज्य ग्रंथ पुरस्कार समिती, बालपुरस्कार समिती आणि एसएससी बोर्डाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असे कामही त्यांनी केले आहे. याउपर, नागनाथ कोतापल्ले हे १९८८ ते ९५ या काळात मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह, १९९५ ते ९६मध्ये साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि साहित्य संस्कृती मंडळाच्या मराठी वाङ्मयकोशाचे समन्वय संपादक होते. तसेच ‘प्रतिष्ठान’ या नियतकालिकाचे संपादक म्हणुनही त्यांनी काम केले आहे.
मुंबईतले युवक साहित्य संमेलन, श्रीगोंद्यात आठवे ग्रामीण साहित्य संमेलन आणि कराडजवळ उंडाळे येथील साहित्य संमेलन, पुण्यातील पहिले औंध उपनगरीय मराठी साहित्य संमेलन (२००३) राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलन इत्यादी संमेलनांची अध्यक्षपदे नागनाथ कोतापल्ले यांनी भूषविली आहेत. याशिवाय, ते २०१२ मध्ये चिपळूण येथील ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष होते. त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.