जळगाव : वैद्यकीय कारणास्तव अंतरीम जामिनावर असलेले माजी मंत्री सुरेश जैन यांना मुंबई खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. राज्यातील बहुचर्चित घरकुल घोटाळ्याप्रकरणी मुंबई खंडपीठासमोर झालेल्या सुनावणी नंतर जामीन मंजूर करण्यात आला. सुरेश जैन यांच्या निकटवर्तीयांनी जामिनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कोणत्या अटी, शर्तिंवर जामीन मंजूर झाला या बाबी सायंकाळी पर्यंत जामिनाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर समजेल असेही सूत्रांनी सांगितले.
माजी सुरेश जैन यांच्या जामिनासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले तरीही त्यांना जामीन मिळालेला नव्हता. २०१९ मध्ये प्रकृतीच्या कारणास्तव जैन यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. दरम्यान, सुरेश जैन यांना मुंबई खंडपीठाने जामीन मंजूर केला असल्याचे वृत्त समोर आले आहे.
राज्यातील बहुचर्चित घरकुल प्रकरणी माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासह अनेक दिग्गज मंत्री, आमदार, नगरसेवक यांना ऑगस्ट २०१८ महिन्याच्या अखेरीस धुळे जिल्हा न्यायालयाने शिक्षा आणि दंड ठोठावला होता. यानंतर बहुतांश संशयितांची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली होती. यातील काही अपवाद वगळता इतरांना जामीन मंजूर करण्यात आला होता. तथापि, प्रमुख संशयित सुरेश जैन यांना दिलासा मिळाला नव्हता