पंधरा दिवसांत हिशोबाची पूर्तता करा अन्यथा साखळी उपोषण; अक्कलकोट पंचायत समितीवर जुनी पेन्शन संघटनेतर्फे हलगीनाद आंदोलन
अक्कलकोट,दि.१ : अक्कलकोट तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वेतनातून कपात अंशदान रकमेच्या हिशोबा सोबतच मृत कर्मचारी कुटुंबियांची रक्कम तातडीने अदा करण्यासाठी अक्कलकोट पंचायत समितीवर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेतर्फे आयोजित हलगीनाद आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते. यावेळी एकच मिशन जुनी पेन्शन च्या टोप्यांसह अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हे आंदोलन संपन्न झाले. यावेळी पंधरा दिवसांत हिशोबाची कार्यवाही पूर्ण न झाल्यास साखळी उपोषणाचा इशारा गटविकासाधिकारी सचिन खुडे, गटशिक्षणाधिकारी कुदसिया शेख यांना लेखी निवेदनाद्वारे संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष राम शिंदे यांनी दिला.
अक्कलकोट तालुका जुनी पेन्शन संघटनेच्यावतीने आयोजित केलेल्या या आंदोलनात गटविकास अधिकारी खुडे यांनी पेन्शन फायटर्सना संबोधित करताना पुढील दोन – तीन दिवसात सर्व चलने शोधून हिशोब पूर्ण करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करु, असा शब्द दिला. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी देखील हिशोब देण्यासाठी आम्ही पूर्ण क्षमतेने काम करत असून पुढील काळात या विषयासाठी आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही, असे आश्वासन दिले. घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता..
एकच मिशन, जुनी पेन्शन च्या टोप्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. गटविकास अधिकारी कार्यालयाने आंदोलनाची दखल घेऊन कालपासून हिशोबासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पेन्शन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने काल काही चलने शोधलेली आहेत. आता या सर्व रक्कमा व्याजासह कर्मचाऱ्यांच्या एनपीएस खात्यावर वर्ग करण्यात याव्यात,अशी मागणी आंदोलनकर्त्यांमधून होत आहे. आजच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र शिक्षक समितीच्या वतीने दयानंद कवडे, शंकर अजगोंडे, आरोग्य विभाग कर्मचारी संघटना, ग्रामसेवक संघटना, शिक्षक भारतीच्या इसाक नागणसुरे, दिव्यांग संघटनेच्या वतीने राजश्री उप्पीन, स्वामी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी राजेंद्र सूर्यवंशी, दयानंद चव्हाण, आशिष चव्हाण, सैदप्पा कोळी, राजशेखर करपे, विक्रम जाधव, अरुण पांचाळ, समीर कुलकर्णी, सिद्धाराम गायकवाड, गिरीश हवालदार, ज्ञानेश्वर केंद्रे, तानाजी चव्हाण, महादेव पाटील, विजयकुमार बिराजदार, श्रीशैल वाडेद, हन्नुरसिद्ध कोळी, लक्ष्मीपुत्र लिंबीतोट, मनोज कदम आदी. प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.