चिमणीचा विषय आता सोडा ; सर्वांनी मिळून बोरामणीचा पाठपुरावा करूया ; चिमणी प्रकरणावर माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे मत
अक्कलकोट, दि.६ : सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीबाबत एवढा गोंधळ घालण्यापेक्षा बोरामणी इंटरनॅशनल विमानतळासाठी सर्वांनी मिळून पाठपुरावा केल्यास निश्चित सोलापूरला विमानसेवा सुरू होईल. दरवेळी गाळप हंगाम वेळी चिमणीचा विषय काढून त्रास देणे हे बरोबर नाही, अशी ठाम भूमिका माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी व्यक्त केली. सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणी वरून वाद पेटला असताना म्हेत्रे यांनी याबाबतचे मत व्यक्त करून आपला पाठिंबा काडादी यांना असल्याचे जाहीर केले आहे.
यापूर्वी काँग्रेसचे सरकार असताना अनेक वेळा मुख्यमंत्री,मंत्री सोलापूरला येऊन गेले. काँग्रेसचे जेष्ठ सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृत महोत्सवावेळी बत्तीस विमाने सोलापूरला येऊन गेली. स्वतः राष्ट्रपतीही एकदा सोलापूरला आले होते. त्यावेळी याच विमानतळावर ते आले होते. हे विसरून चालणार नाही. केवळ चिमणीमुळे विमानसेवा सुरू नाही, असा तथ्यहीन कांगावा करण्यापेक्षा बोरामणी विमानतळासाठी हीच ताकद सर्वांनी मिळून लावण्याची गरज आहे.
अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान या कारखान्यामुळे उंचावले आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. दरवेळी हंगाम सुरू झाला की असे करतात आणि संपला की चिमणीचा विषय बंद. हे योग्य नाही. म्हणून आमचा
पूर्णपणे काडादी यांना पाठिंबा आहे. वेळ आली उग्र आंदोलन पण करू.या कारखान्याला स्व.आप्पासाहेब काडादी यांचा वारसा आहे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून माजी अध्यक्ष धर्मराज काडादी हे कारखाना चालवत आहेत. दरवर्षी ते शेतकऱ्यांना चांगला भाव देतात. शेतकऱ्यांना कसे चांगले होईल हे नेहमी बघत असतात.
एक चांगला साखर कारखाना सुरू असताना एका चिमणीच्या नावाखाली आणि विमान उडवण्याच्या नावाखाली हे जे प्रकार चालू आहे ते बंद करावे. समजा आज चिमणी पाडली तर उद्या विमानसेवा सुरू होणार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ज्यावेळी विमानसेवा सुरू होती त्यावेळी चिमणीचा अडथळा आला नाही आता कसे काय अडथळा आहे. माझी सर्व पक्षांना विनंती आहे की, चिमणीचा गोंधळ घालण्यापेक्षा बोरामणी विमानतळाकडे सर्वांनी लक्ष दिले तर आतापर्यंत इंटरनॅशनल कार्गो विमानतळ तयार झाले असते. आज गुलबर्गा, विजापूर या ठिकाणी विमानतळ सुरू झाले. मग इथे त्याच्या अगोदर मंजुरी असताना फक्त एका माळढोक पक्षाचे कारण पुढे करून हे काम रखडत ठेवले, असा आरोप त्यांनी केला.
चिमणीच्या बाबतीत तर चुकीचे चालले आहे म्हणून सर्वांनी मिळून काडादी यांच्यासह सर्वांनी मिळून बोरामणीसाठी पाठपुरावा करूया,असेही ते म्हणाले. या चिमणीबाबत मी स्वतः अक्कलकोट तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीना व सोसायटयाना आवाहन केले आहे. सर्वांनी आपापल्या ग्रामपंचायत आणि सोसायटीचे ठराव चिमणीच्या बाजूने दिलेले आहेत. अजूनही काही राहिले असतील तर त्यांनी पाठिंबा दर्शवावा.चिमणी पाडू नये,शेतकऱ्यांचे मंदिर म्हणून जे ओळखले जाते तो सिद्धेश्वर साखर कारखाना. त्याला कोणी धक्का लावू नये.त्यासंबंधीचा ठराव सर्व सरपंच देत आहेत.
आज हजारो लोक चिमणीच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरत आहेत आंदोलन करत आहेत. यावरून कारखान्याबद्दल किती आस्था आणि जिव्हाळा आहे हे लक्षात येते. शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत हे सरकारने लक्षात घ्यावे, असे त्यांनी सांगितले.