संभाजी बिग्रेड आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या इशाऱ्यानंतर झी मराठी वाहिनी ‘हर हर’ महादेव’ चित्रपट कशा पद्धतीने प्रदर्शित करणार वाचा सविस्तर
मुंबई : ‘हर हर महादेव’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटातील काही दृश्यांवर प्रचंड आक्षेप घेण्यात आला होता. इतकंच नाही तर, ‘हर हर महादेव’ हा चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित करण्यात येऊ नये, अशी मागणी देखील झाली होती. यावेळी स्वतः संभाजीराजे छत्रपती आणि संभाजी बिग्रेडने पत्र लिहित इशारा देखील दिला होता. यानंतर आता ‘हर हर महदेव’ या चित्रपटासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ‘हर हर महादेव’ हा चित्रपट १८ डिसेंबरला टीव्हीवर प्रदर्शित होणार आहे.
‘हर हर महादेव’ या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर, अभिनेता शरद केळकर याने बाजीप्रभू देशपांडे साकारले आहेत. या चित्रपटात अफझल खानाचा वध आणि पावनखिंडीतील लढाई दाखवण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांनी गाजवलेल्या इतिहासावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. मात्र, चित्रपटाच्या कथेत अनेक चुकीच्या गोष्टी दाखवण्यात आल्याचे अनेकदा म्हटले गेले. ‘हर हर महादेव’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर देखील अनेक ठिकाणी निदर्शने करून, हा चित्रपट बंद पाडण्यात आला होता. मात्र, आता हा चित्रपट टीव्हीवर दाखवण्यात येणार असल्याचे कळताच अनेक संघटनांनी पुन्हा विरोधाचा झेंडा दाखवला. तर, संभाजी बिग्रेड आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी थेट इशारा दिला. यानंतर आता झी मराठी वाहिनीने ‘हर हर’ महादेव’ या चित्रपटातील वादग्रस्त भाग वगळून चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे