ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्यातील २० ग्रामपंचायतीवर वर्चस्व कोणाचे ? निवडणूक निकालाकडे साऱ्यांचे लक्ष

मारुती बावडे

अक्कलकोट, दि.१७ : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार हे पाहावे लागणार आहे. तालुक्यात सध्या २० ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत.या निकालाचा परिणाम आगामी निवडणुकांवर होणार आहे.

तालुक्यातील शिरवळवाडी, कोन्हाळी, बोरगाव दे, बोरेगाव, हालचिंचोळी,अंकलगे, दहिटणेवाडी, रुददेवाडी, आंदेवाडी ज, पालापूर, घोळसगाव, नाविदगी, खानापूर, दर्शनाळ, अरळी, सदलापूर, हत्तीकणबस, शिरवळ, सलगर आणि सुलतानपूर या गावात रविवारी निवडणुका पार पडल्या. यातील १७२ जागापैकी ३४ जागा ह्या बिनविरोध झाल्या.उर्वरित जागांसाठी मात्र शांततेत निवडणूक पार पडली. ह्या निवडणुकीत नातीगोती, विकासाचा मुद्दा, स्थानिक हेवेदावे, एकमेकांवरची वर्चस्वाची लढाई तसेच तालुक्यातील संबंध राजकीय स्थितीचा विचार करून बांधलेले आडाखे या सगळ्या मुद्द्याचा विचार करून गावागावात निवडणुकीदरम्यान वातावरण तापलेले पाहायला मिळाले.

स्थानिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विकासापेक्षा जातीपातीचे राजकारण हे अधिक होत असते आणि ते चित्र या निवडणुकीत देखील सर्वत्र पाहायला मिळाले. मागील निवडणुकीचा इतिहास पाहता अनेक गावांमध्ये जनतेचा सत्ताधाऱ्याविरुद्ध कौल पाहायला मिळतो. काही ठिकाणी अपवाद वगळता पुन्हा त्याच सत्ताधाऱ्यांना निवडून दिले जाते. ज्या ठिकाणी सुज्ञ मतदारांची संख्या अधिक असते. त्या ठिकाणी निकाल निर्णायक ठरतो.

निवडणूक लागलेल्या गावांमध्ये सलगर, घोळसगाव, शिरवळ, अंकलगे, खानापूर या गावातील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण या ठिकाणच्या निवडणूका प्रचंड चुरशीच्या ठरल्या. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आहेत अशा स्थितीमध्ये या गावातील सत्ता आपल्या गटाकडे किंवा आपल्या नेत्याकडे राहावे, यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे गनिमी कावा पद्धतीने कार्यकर्त्यांना ताकद देत आहेत. थेट ते कुठेही कुणाच्या प्रचाराला दिसत नसले तरी आतून त्यांनी रसल पुरवली आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोण कोणाला भारी पडणार हे पाहावे लागेल. काही गावांमध्ये भाजप आणि काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी एकत्र लढत आहेत. काही ठिकाणी तो भाजपचा,हा काँग्रेसचा म्हणून एक-मेका विरुद्ध निवडणुका लागल्या आहेत.

या निवडणुका पक्षावर होत नसल्या तरी संमिश्र पद्धतीने आपल्याच पक्षातील नेत्याविरुद्धही निवडणूक लढवत असल्याच्या घटना या निवडणुकीमध्ये घडल्या आहेत. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांचा संबंध फारसा येत नसला तरी या ठिकाणी आपल्या गटाचा सरपंच व्हावा आणि आपल्या गटाचे सदस्य जास्त निवडून यावेत. यासाठी मात्र भाजप आणि काँग्रेसवाल्यांकडून जोरदार प्रयत्न होताना दिसले. शिरवळ ग्रामपंचायतमध्ये बिनविरोधचा प्रयत्न थोडक्यात हुकला.त्या ठिकाणी बिनविरोची प्रयत्न झाले होते. यावेळी पहिल्यांदाच एकही ग्रामपंचायतीचा सरपंच बिनविरोध झाला नाही. यावरून गावागावांमध्ये सत्तेसाठी किती मोठा संघर्ष झालेला आहे हे देखील लक्ष देऊ शकते. असा संघर्ष आगामी निवडणुकांमध्ये देखील होऊ शकतो. मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचा पराभव झालेला आहे अशा स्थितीमध्ये म्हेत्रे हे प्रत्येक घडामोडीकडे बारीकाईने लक्ष ठेवत आहेत तर दुसरीकडे केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याने आमदार कल्याणशेट्टी हे सर्वाधिक गावे ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या वर्चस्वाच्या लढाईत कोण बाजी मारणार हे उद्या समजणार आहे.

 

चुरस आणि कमालीचा संघर्ष

ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा पाया आहे. या निवडणुकीत ज्या पक्षाचे, नेत्यांचे गट जिंकून येतात त्याच नेत्यांचा बोलबाला हा त्या पुढच्या निवडणुकीमध्ये दिसून येतो. त्यामुळे या निवडणुका कोणीही सोप्या पद्धतीने घेत नाही त्यामुळेच या निवडणुकीमध्ये कमालीचा संघर्ष दिसून येतो

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!