ध्यास विश्वसार्ह बातमीचा

समर्थनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचाविरोधात अविश्वास ठराव दाखल

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील समर्थ नगर ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री पाटील व उपसरपंच लालसिंग राठोड यांच्याविरोधात सात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या ग्रामपंचायतीचे एकूण नऊ सदस्य आहेत. थेट सरपंच महिला असल्याने अविश्वास ठरावासाठी तीन चतुर्थांश बहुमत असणे आवश्यक आहे. तर उपसरपंच पुरुष असल्याने दोन तृतीयांश म्हणजे ९ पैकी ६ सदस्यांचा ठराव असणे आवश्यक आहे. हा ठराव मंजूर होण्याच्या दृष्टीने विरोधी सदस्यांकडून हालचाली सुरू आहेत.

या ग्रामपंचायतीवर सध्या भाजपची एकहाती सत्ता आहे.यात एक हाती सत्ता असताना सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेणे, कारभार मनमानी पद्धतीने करणे अशा प्रकारचा ठपका या सदस्यांनी या अविश्वास ठरावात ठेवल्याचे समजते. शुक्रवारी हा ठराव प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे. २०११ च्या जणगणनेनुसार या ग्रामपंचायतीची लोकसंख्या साधारण तीन हजाराच्या आसपास आहे. आता यानंतरची कार्यवाही प्रशासन करणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तहसीलदार हे सात दिवसाच्या आत सर्व सदस्यांना नोटीस बजावतील. त्यानंतर विशेष सभा बोलावली जाईल. या सभेत ठरावाच्या बाजूने किती मतदान होतील ते पाहिले जाईल. आणि तो अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला जाईल. त्यानंतर पुढील प्रक्रिया पार पडणार आहे. या ग्रामपंचायतीच्या सरपंच महिला असल्याने त्यात थेट सरपंच असल्याने याबाबतची नियमावली वेगळी आहे. त्यामुळे पुढील प्रक्रिया ही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पार पडेल, अशी माहिती मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!