ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हिंदू राष्ट्राची मागणी संविधानिक ; अक्कलकोटच्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदूंचा संघटित होण्याचा निर्धार

अक्कलकोट,दि.२१ : हिंदू राष्ट्राची मागणी संविधानिक आहे ती आम्ही मिळविणारच आहोत त्यासाठी आधी हिंदूंनी संघटित होणे गरजेचे आहे या सभेच्या निमित्ताने सर्वांनी निर्धार करावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक राजन बुणगे यांनी केले. बुधवारी, अक्कलकोट येथील प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते.

यावेळी हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या अलका व्हनमारे यांनीही उपस्थितांना संबोधित केले.पुढे बोलताना बुणगे पुढे म्हणाले की,हिंदु राष्ट्राची मागणी ही संविधानविरोधी नाही. भारताच्या राज्यघटनेत ‘सेक्युलर’ हा शब्द नव्हता. वर्ष १९७६ मध्ये इंदिरा गांधी सरकारने आणीबाणीच्या काळात घटनादुरुस्ती करून ‘सेक्युलर’ आणि ‘समाजवाद’ हे शब्द राज्यघटनेच्या प्रस्तावनेत घुसडले. जर घटनादुरुस्ती करून भारताला ‘सेक्युलर’ बनवले जाऊ शकते, तर पुन्हा एकदा घटनादुरुस्ती करून भारताला ‘हिंदु राष्ट्र’ का बनवले जाऊ शकत नाही असा सवाल त्यांनी केला.

रणरागिणी शाखेच्या व्हनमारे म्हणाल्या, फसव्या प्रेमाच्या नावाखाली हिंदू युवतींना धर्मांतरित करण्याचे षडयंत्र म्हणजे ‘लव्ह जिहाद. पालकांनी लहानपणापासून मुलीवर हिंदु धर्मातील कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक नीतीमूल्यांचे संस्कार करण्याविषयी दक्ष असायला हवे. हिंदू कुटुंबात आणि हिंदुस्थानात जन्म झाल्याचा अभिमान मुलीमध्ये जागृत राहील, यासाठी प्रयत्न करायला हवे. हिंदु संस्कृती, हिंदु धर्म ग्रंथ, हिंदु धर्माचा इतिहास आणि हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व आदी गोष्टींचे महत्त्व मुलींच्या मनावर बिंबवायला हवे, त्यामुळे ‘लव्ह जिहाद’पासून हिंदू युवतींचे रक्षण होईल.

या सभेला नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, पक्षनेते महेश हिंडोळे, माजी उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे,जेष्ठ पत्रकार बाबा निंबाळकर आदींसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह शहर, तसेच आजूबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचा प्रारंभ शंखनादाने करण्यात आला. त्यानंतर मान्यवर वक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. सभेच्या ठिकाणी राष्ट्र आणि धर्म यांविषयी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.

ही सभा यशस्वी करण्यासाठी आनंद खजूरगीकर,तम्मा शेळके, मलम्मा पसारे, संदीप कटकधोंड, मनोज सक्करगी,भीमराव साठे,आतिश कटारे, प्रथमेश पवार, राजेंद्र हुच्चे, सुभाष पुजारी, किशोर जगताप आदींनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन वर्षा जेवळे आणि रश्मी चाळके यांनी केले.

बालचमूंनी केले अनोखे प्रबोधन

सभास्थळी क्रांतीकारकांची यशोगाथा आणि धर्माचरण यांचे महत्त्व विषद करण्यासाठी बालचमूंनी क्रांतीकारक आणि पारंपारिक वेशभूषा परिधान केलेला बालसंस्कार कक्ष उभारण्यात आला होता. याद्वारे नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत होते.याला मोठा प्रतिसाद मिळाला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!