दिशा सॅलियन आत्महत्या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली विधानसभेत महत्त्वपूर्ण घोषणा
मुंबई : दिवंगत अभिनेत सुशांतसिंह राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियन यांच्या आत्महत्या प्रकरणावरून भाजप आणि शिंदे गटानं माजी मंत्री आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. सुशांतचा मृत्यू होण्यासाठी आदित्य ठाकरेंनी त्याची प्रेयसी रिया चक्रवर्तीला ४४ वेळा फोन केल्याचा खळबळजनक आरोप शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी केला आहे. त्यानंतर आता या प्रकरणाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
हिवाळी अधिवेशनात दिशा सालियनच्या आत्महत्या प्रकरणावर चर्चा सुरू होताच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सभागृहात रणकंदन पाहायला मिळालं. परिणामी विधानसभा अध्यक्षांना तब्बल पाचवेळा सभागृहाचं कामकाज तहकूब करावं लागलं. त्यानंतर सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या विषयावर बोलताना म्हणाले की, दिशा सालियन प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांमार्फत सुरू आहे. त्यामुळं ज्या लोकांकडे या प्रकरणातील काही पुरावे असतील तर त्यांनी त्यांनी द्यायला हवेत. परंतु आता या प्रकरणाचा तपास आम्ही एसआयटीमार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे, असं सांगत फडणवीसांनी दिशा सालियन प्रकरणाबाबत मोठी घोषणा केली आहे.