गुजरात : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांची प्रकृती खालावल्यामुळं त्यांना अहमदाबाद येथील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हिराबेन मोदी यांनी या वर्षी १८ जून रोजी वयाची ९९ वर्षे पूर्ण करून शंभराव्या वर्षात पदार्पण केलं आहे. आईच्या वाढदिवशी पंतप्रधान मोदी यांनी गांधीनगरला जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले होते. काल रात्री त्यांना प्रकृतीचा त्रास जाणवू लागल्यामुळं तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, हिराबेन यांना रक्तदाबाचा त्रास जाणवत आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं.
हिराबेन दाखल असलेल्या रुग्णालयाच्या बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हिराबेन यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव कैलासनाथन हे रुग्णालयात पोहोचले आहेत. भाजपचे स्थानिक आमदारही रुग्णालयात पोहोचल्याची माहिती आहे. गुजरात विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत हिराबेन यांनी मतदान केलं होतं. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी ४ डिसेंबर रोजी त्यांची भेट घेतली होती.