हिवाळी अधिवेशनात आज देवेंद्र फडणवीसांनी केली अजित पवार, जयंत पाटील तसेच राष्ट्रवादीच्या अंतर्गत बाबींवर टोलेबाजी
नागपूर : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दोन दिवसांचं कामकाज सुरू आहे. नागपूरमध्ये सुरू असलेल्या या अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाषणावर प्रत्युत्तर देत, राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अंतर्गत घडामोडींवर भाष्य केलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा सभागृहात विदर्भाच्या मुद्द्यावरील व बँकाच्या स्थितीबद्दल चर्चेदरम्यान तुफान टोलेबाजी केली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या टिप्पणीवर फडणवीसांनी उत्तर दिलं. अजितदादा म्हणाले की अमृताशी बोला पण दादा तुम्ही हे बोलताना सुनेत्राताईंना विचारलं होतं का? असा मिश्कील प्रश्न फडणवीस यांनी अजित पवार यांना विचारला. राज्याच्या मंत्रिमंडळात एकाही महिला मंत्र्यांचा समावेश नसल्यामुळे अजित पवार यांनी थेट अमृता फडणवीस याचं नाव घेतलं होतं. मी याबाबत अमृता वहिनींशीच बोलणार आहे, असं अजित पवार म्हणाले होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यांचं भाषण मी अनेकदा ऐकलं आहे. मात्र यावेळीचं भाषण जयंतरावांनी लिहून दिल्यासारखं वाटलं. जयंतराव बाहेर आहेत त्यामुळे त्यांचं भाषण पहायला मिळालं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. अजित पवार याचं भाषण कायमच रोखठोक असतं. पण त्यांचं या वेळचं भाषण १०० टक्के अजित पवार याचं वाटत नव्हतं. त्यातील ५० टक्के मुद्दे जयंत पाटील यांचाही वाटत होत. असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
फडणवीस म्हणाले की, अजित दादांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली. कोण मुख्यमंत्री झाले, किती झाले वगैरे.. पण दादा एका गोष्टीचे दु:ख आहे, तुम्हाला मुख्यमंत्री होण्याची संधी असतानाही पवारसाहेबांनी तुमची संधी हिरावून घेतली. २००४ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीमधील कराराप्रमाणे ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असं असताना, शरद पवारांनी तुम्हाला मुख्यमंत्री न करता काँग्रेसला संधी दिली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले