अक्कलकोट, दि.१ : परमार्थ करण्याने माणूस संस्कारी होतो. आचरण करण्याने माणूस शुद्ध होतो तर दास बनण्याने त्यास सद्गुरु कृपा प्राप्त होते, असे प्रतिपादन ह.भ.प सदगुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले. अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे स्व.प्रकाश पाटील यांच्या तेराव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते.
आवडीने भावे, हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, हा संत एकनाथ महाराजांचा अभंग त्यांनी कीर्तनासाठी घेतला होता.या किर्तन सोहळ्याचे आयोजन ह.भ.प आबा महाराज कुरनूरकर यांनी केले होते. औसेकर महाराज पुढे म्हणाले की, परमार्थात दुःख शोधूनही सापडणार नाही व संसारातील सुख हे मृगजळाप्रमाणे आहे. माणूस त्या सुखासाठी कितीही पळत राहिला तरी मृगजळाने त्याची तृप्ती कधीच होणार नाही कारण त्यात मुळातच सुख नसल्याने आनंद प्राप्त होणार नाही म्हणून माणसाने परमार्थ करावा. कुटुंबामध्ये विचार विनिमय असावा, श्री ज्ञानेश्वरी, श्री भागवत व तुकोबारायांची गाथा याचे कुटुंबामध्ये सामुदायिक नित्य वाचन करावे. पवित्र अशी तुळशीची माळ घालून एकादशीचा व्रत करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पंढरपूरच्या पांडुरंगास प्राप्त करावयाचे झाल्यास आई-वडिलांची सेवा करा.त्यांना घरी त्रास देऊ नका, कारण आपल्या आई-वडिलांइतका सांभाळ कुणी केला नाही. त्यांच्या शब्दाचा आदर व विचार करा. श्री पुंडलिकरायाने आई-वडिलांची सेवा करून पंढरपूर हे महाक्षेत्र केले.
वैकुंठीचा देव आणीला भुतळा, हे सर्व त्यांनी सेवेतून केले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तरुणांनी आई-वडिलांची सेवा करा, असे ते म्हणाले. या किर्तन सोहळ्याला शिवभक्त सुरेश पाटील महाराज, ह.भ.प सुरेश परिहार महाराज, औदुंबर पाटील, दिगंबर पाटील सोहळ्याला उपस्थित होते.
कीर्तनात गायनासाठी राम चव्हाण, औदुंबर खलाटे, राजू पवार, नागु कांबळे, वैभव उंबरे, नाना भगत यांनी तर मृदंगावार कृष्णा चव्हाण, हरिओम पाटील, मोहन चव्हाण, श्रीहरी पाटील आदी सहकाऱ्यांनी साथसंगत केली. यावेळी कुरनूर व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२० दिंड्या सहभागी
या किर्तन सोहळ्यासाठी चव्हाणवाडी, हिप्परगाताड, इटकळ, केरूर, बाभळगाव, हाळ वागदरी, शहापुर, किणी, गुळहळळी, दहिटणे, सुलतानपूर, चुंगी, किणीवाडी, काझीकणबस, बोरगाव दे, शिरवळ, सिंदखेड, मोट्याळ, दिंडेगाव, काळेगाव परिसरातून २० दिंड्या सहभागी झाल्या होत्या.