ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ग्रामपंचायतीचे सर्व दाखले आता मिळवा आपल्या मोबाईलवर !

अक्कलकोट, दि.२ : ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक दाखल्यासाठी ग्रामपंचायतला व शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. महाराष्ट्र शासनाकडून ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना घरबसल्या विविध प्रकारचे दाखले, परवाने आणि प्रमाणपत्र देण्यासाठी महा इ ग्राम सिटीजन कनेक्ट ॲप विकसित केले आहे. यावरून ग्रामीण भागातील नागरिकांना ग्रामपंचायत कार्यालयातून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या सेवेसाठी घरबसल्या अर्ज करता येणार आहे.

ग्रामपंचायत कार्यालयातून मिळणारा जन्म दाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी दाखला, मालमत्तेसंबंधीचे उतारे, तसेच घरपट्टी, पाणीपट्टी कर भरणा करायचा असल्यास ग्रामपंचायत मध्ये जाण्याची आता ग्रामस्थांना गरज राहणार नाही. यासाठी महाराष्ट्र सरकारने महा ई ग्राम सिटीजन ॲप सुरू केले आहे. नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारचे दाखले मिळण्यासाठी चकरा मारावे लागतात. प्रत्येक वेळी आपल्याला दाखला वेळेवर मिळेल त्याची खात्री नसते. त्यामुळे सदर ॲप मोबाईलवर डाऊनलोड करून त्यावर दाखल्याची मागणी केल्यास सदर दाखला आपल्याला आता मोबाईलवर मिळणार आहे.

प्ले स्टोअर वरून ॲप डाऊनलोड केल्यावर त्यात नाव,लिंग, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी ही माहिती भरून नोंदणी करावी लागते.त्यानंतर संबंधित व्यक्तीला युजरनेम आणि पासवर्ड प्राप्त होईल त्यानंतर विविध प्रकारचे दाखले व प्रमाणपत्रासाठी या ॲप मधून अर्ज करावे लागेल व ते थेट ग्रामपंचायतीकडे दाखल होतील व त्यानंतर अर्जदाराला मोबाईलवरच दाखला प्राप्त होईल.

या ॲपवरून जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, दारीद्र रेषा खालील प्रमाणपत्र, घर जागेचा उतारा या सेवा उपलब्ध होतील.तसेच लोकांना यावरून मिळकतीचा कर घर बसल्या भरता येणार आहे व आपली किती बाकी आहे व कर भरल्यानंतर किती शिल्लक आहे हे सुद्धा ग्रामस्थांना आपल्या मोबाईलवरून समजणार आहे.

 

नागरिकांची सोय होणार

या ॲपमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना घरबसल्या दाखले मिळणार आहेत. त्याचबरोबर ग्रामपंचायतीनाही विविध कर वसुलीची ऑनलाईन सुविधा मिळणार आहे. या माध्यमातून जमा होणारा सर्व पैसा हा ग्रामपंचायतच्या खात्यात जमा होणार आहे – सचिन खुडे,गटविकास अधिकारी, अक्कलकोट

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!