ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अंत्ययात्रा निघाली, रेल्वे फाटक पडले, पाऊण तास प्रेत घेऊन थांबावे लागले… होटगी स्टेशनमधील घटना, 4 रेल्वे फाटकमुळे नाहक त्रास

दक्षिण सोलापूर, दि.3- होटगी स्टेशन येथील रहिवाशी सिद्धू कोकरे (वय 65) यांचे मंगळवारी निधन झाले. सकाळी साडेदहा वाजता त्यांची राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघाली. स्मशानभूमीकडे जाताना रस्त्यात अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे रेल्वे फाटक जवळपास पाऊण तास बंद राहिले. त्यावेळी पाचशे ते सहाशे नागरिकांना प्रेत घेऊन रस्त्यात ताटकळत थांबावे लागले. ना लक्ष प्रशासनाचे ना सिमेंट कंपनीचे, त्रास मात्र नागरिकांना सोसावे लागत आहे.

सोलापूर ते वाडी लोहमार्गावर दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी येथील तिलाटी ते होटगी रेल्वे स्थानक दरम्यान सात किलोमीटरच्या अंतरात रेल्वेचे तब्बल चार फाटक आहेत. 61 क्रमांक रेल्वे फाटक, चेट्टीनाड सिमेंट कंपनी, झुयारी सिमेंट कंपनी आणि अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे हे चार फाटक आहेत. यामुळे विद्यार्थी रुग्ण नोकरदार आणि येथील प्रवाशांना दररोज मोठा त्रास सहन करावा लागतो. वारंवार येथे रेल्वे फाटक बंद केले जाते. 61 रेल्वे फाटक 24 तासात सुमारे 100 ते 150 वेळा दहा ते पंधरा मिनिटांसाठी बंद केले जाते.

सिमेंट फॅक्टरीचे रेल्वे फाटक अर्धा तासाहून अधिक काळ बंद केले जाते. मंगळवारी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे रेल्वे फाटक अर्धा तासाहून अधिक काळ बंद होते. अंत्यसंस्कारासाठी प्रेत घेऊन जाताना अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे फाटक बंद झाले. त्यामुळे नागरिकांना अर्धा ते पाऊण तास थांबून राहावे लागले. नागरिकांनी यावेळी सिमेंट कंपनीसह रेल्वे प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी बाबत तीव्र नाराजी व संताप व्यक्त केले. होटगी स्टेशनचे सरपंच जगन्नाथ गायकवाड यांनी सिमेंट कंपनीकडे स्मशानभूमीसाठी पर्यायी जागा द्या अथवा रेल्वे फाटक बंद करण्याची मागणी केली आहे.

7 किलोमीटरमधील 4 रेल्वे फाटक बंद करा
गेल्या वर्ष-दीड वर्षांपासून इंगळगीचे राहुल वंजारे आणि सागर धुळवे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी तसेच रेल्वे प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन तिलाटी स्टेशन ते होटगी स्टेशन सात किलोमीटरच्या अंतरातील चार रेल्वे फाटक बंद करण्याची मागणी करीत आहेत. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. येत्या काळात रेल्वे फाटक बंद करण्यासाठी लढा उभारला जाणार आहे. या चार रेल्वे फाटकांमुळे विद्यार्थी, नागरिक, रुग्ण व प्रवाशांना मोठा त्रास होत आहे. तत्काळ रेल्वे फाटक बंद करण्याची मागणी इंगळगीचे राहुल वंजारे आणि सागर धुळवे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!