अक्कलकोट, दि.५ : कुरनूर धरणावरील कालवा सल्लागार समितीची बैठक (शनिवार) दि.७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मैंदर्गी रोडवरील बोरी पाटबंधारे शाखेच्या कार्यालयात होणार आहे.
या बैठकीत उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश बाबा यांनी दिली.सध्या कुरनूर धरणामध्ये ९२ टक्के पाणीसाठा आहे.या पाण्याचा विनियोग पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने करावयाचा यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. दरवर्षी पाटबंधारे विभागाच्यावतीने कालवा सल्लागार समितीची बैठक होत असते.
या बैठकीमध्ये शेतकरी आणि सल्लागार समितीच्या सदस्यांना बोलवून याबाबत निर्णय घेतला जातो.या बैठकीत कुरनूर धरणातून पाणी सोडण्याबाबतचाही निर्णय घेतला जाणार आहे.या बैठकीला आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मोहन जाधवर यांच्यासह इतर अधिकारी व सदस्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.रब्बी व उन्हाळा हंगाम २०२२ आणि २३ यासाठीचे नियोजन या बैठकीत
केले जाईल.यावर्षी पावसाळ्यात प्रचंड पाऊस झाल्याने कुरनूर धरणात मोठ्या प्रमाणात पाणी शिल्लक आहे त्यामुळे यंदाचा उन्हाळा सुसह्य होणार आहे तरीही पुढच्या तीन ते चार महिन्याच्या कालावधीत या पाण्याचा वापर कशा पद्धतीने करण्यात येणार आहे.याची माहिती या बैठकीत दिली जाणार आहे,अशी माहिती बाबा यांनी पत्रकारांना दिली.