ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बहुकार्य करणारा विद्यार्थी घडवण्यासाठी कौशल्याचा वापर करावा: कुलगुरू डॉ. फडणवीस ; सोलापूर विद्यापीठात राज्यभरातील शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू

सोलापूर, दि.9- आज सर्वच क्षेत्रात बहुकार्य करणाऱ्या व्यक्तींना विशेष महत्त्व आहे. म्हणजे ज्याच्याकडे एकापेक्षा अधिक क्षेत्राचे ज्ञान आहे, ती व्यक्ती चांगल्या प्रकारे कार्य करू शकते आणि आयुष्यात यशस्वी होऊ शकते. त्यानुसार शिक्षकांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना एका पेक्षा अधिक क्षेत्राचे ज्ञान द्यावे, त्यांना कौशल्याने परिपूर्ण करावे, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था पुणे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अभ्यासक्रमात कौशल्याचा समावेश करणे’ या विषयावर आयोजित दि. 9 ते 13 जानेवारी 2023 या पाच दिवशी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी राज्य अध्यापक विकास संस्थेचे प्रतिनिधी सुरज बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कौशल्य विकास केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत करीत कार्यशाळेची विस्तृत माहिती दिली.

कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने समाजाची गरज ओळखून रोजगार व स्वयंरोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून 143 कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम सुरू केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला व त्या माध्यमातून विद्यापीठ समाजाशी जोडले गेले. पॅरामेडिकल स्किल कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांनी कोविड काळात रुग्णांची सेवा करीत देशासाठी मोठे योगदान दिले. आज भारत देश जगात जीडीपीवर पाचव्या क्रमांकावर आहे. फ्रान्स, कॅनडाला भारताने मागे टाकले आहे. आरोग्यावर दुसरा क्रमांक तर डिजिटलवर पाचवा क्रमांक असलेल्या भारताचा स्किलवर 132 वा क्रमांक लागतो. स्किलच्या बाबतीत भारत खूप मागे आहे. हा क्रमांक पुढे आल्यास निश्चित भारत विश्वगुरू बनेल, असा विश्वास कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

सुरज बाबर यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांना अधिकाधिक ज्ञान मिळावे, याकरिता महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेने शिक्षकांसाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेतल्याचे सांगितले. या कौशल्य विकासाच्या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमासाठी एकूण 130 जणांनी नोंदणी केली होती. मात्र 40 जणांची क्षमता असल्याने आपण एकूण 44 जणांनाच प्रशिक्षण देत असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे, मुंबई, नागपूर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव आदी संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रुती देवळे यांनी केले तर आभार सहसमन्वयक डॉ. श्रीराम राऊत यांनी मानले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!