नवी दिल्लीः भारतीय तेल कंपन्यांनी आज सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे. पेट्रोल दरात ६ पैसे तर डिझेलमध्ये १६ पैसे वाढ केली आहे. याआधी सोमवारी पेट्रोल ७ पैसे तर डिझेल १८ पैशांनी महागले होते. कोरोनाच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर दुचाकी आणि वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
आजच्या दरवाढीने आज मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८८.२९ रुपये आणि डिझेल ७७.९० रुपये झाला आहे.दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.५९ रुपये असून डिझेल ७१.४१ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.६४ रुपये असून डिझेल ७६.८८ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ८३.१५ रुपये आहे. डिझेलचा भाव ७४.९८ रुपये प्रती लीटर झाले आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्यानं वाढत असल्यानं वाहन चालकांना त्याचा मोठा भुर्दंड सहन करावा लागतो आहे. आज मंगळवारी सिंगापूरमध्ये ब्रेंट क्रूड ऑइलचा भाव ३ सेंट्सने वाढून प्रती बॅरल ४६.०९ डॉलर झाला. त्याचबरोबर यूएस वेस्ट टेक्सास क्रूडचा भाव ११ सेंटसने वधारून ४३.१७ डॉलर इतका झाला. क्रूडचा भाव तीन महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर आहे. सोमवारी दोन्ही तेलाच्या किमतीत अनुक्रमचे २ टक्के आणि ५ टक्के वाढ झाली होती.