सोलापूर, दि. 12 : दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी प्रत्यक्ष ग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या (बिनविरोध उमेदवारांसह ) सर्व उमेदवारांनी त्यांच्या निवडणुकीचा खर्च मा. राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या मुदतीत व विहित पध्दतीने दिनांक 19 जानेवारी 2023 पर्यंत संबंधित तहसिलदार यांच्याकडे सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/ग्रापनि- 2018/प्र.क्र.08/का-8 दि 9 नोव्हेंबर 2022 रोजीच्या आदेशान्वये माहे ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सदस्य पदासह थेट सरंपच पदाच्या) सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणकप्रणालीव्दारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमानुसार सोलापूर जिल्ह्यातील एकूण 189 ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडलेल्या आहेत. सदर कार्यक्रमानुसार दि. 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होऊन दि. 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी पूर्ण झालेली आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 – ब (1) नुसार ग्रामपंचायतीची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारानी आपल्या निवडणूक खर्चाच्या हिशोबाची विवरणे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 30 दिवसांच्या आत राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या वेळेमध्ये आणि आवश्यक रितीने सादर करणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब सादर करण्यास कसूर केल्यास आणि अशा कसुरीसाठी तिच्याकडे कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन नसले तर ती व्यक्ती निरर्ह असल्याचे घोषित करील आणि अशी व्यक्ती, अशा आदेशाच्या दिनांकापासून पाच वर्षाच्या कालावधीकरिता पंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा असा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास निरर्ह असेल.
त्या अनुषंगाने दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी प्रत्यक्ष निवडणूक लढविलेल्या (बिनविरोध उमेदवारांसह ) सर्व उमेदवारांनी त्यांच्या निवडणूकीचा खर्च मा. राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या मुदतीत व विहीत पध्दतीने दिनांक 19 जानेवारी 2023 पर्यंत संबंधित तहसिलदार यांचेकडे सादर करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे