ध्यास विश्वसार्ह बातमीचा

श्रीशैल पीठाच्या धर्मसंमेलनातुन समाजाला नवी दिशा ; डाॅ.चन्नसिध्दराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे प्रतिपादन

अक्कलकोट,दि.११ : संपूर्ण मानव जातीला अध्यात्म ही लाभलेली खूप मोठी देणगी आहे.श्रीशैल पिठाने राबविलेल्या या उपक्रमातून मानवाला व्यसन मुक्ती, निसर्ग प्रेमाची जागृती होणार आहे यातून निश्चित समाजाला दिशा मिळेल, असे प्रतिपादन श्रीशैल पीठाचे श्री श्री श्री १००८ डाॅ.चन्नसिध्दराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले. श्रीशैल पीठाचे जगद्गुरू श्री श्री श्री १००८ डाॅ.चन्नसिध्दराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षपुर्तीनिमीत्त व त्यांच्या पीठारोहण कार्यक्रमास बारा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल श्रीशैल पीठात आयोजित धर्मसंमेलनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील विविध मान्यवरांची मांदियाळी दिसून आली.

पुढे बोलताना श्रीशैल पिठाचे जगद्गुरू म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील भाविकांचे नाते अतूट आहे.वर्षभर याठिकाणी सोलापूरचे भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात.येथे होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना ते भक्ती भावाने हजेरी लावतात. पदयात्रेच्या कार्यक्रमात देखील सर्व भाषिक लोक सहभागी झाले होते, असेही ते म्हणाले.

काशी पिठाचे जगद्गुरू डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजीं म्हणाले, आम्ही कालपासून यज्ञामध्ये सहभागी झालो होतो. आम्हाला समाधान वाटले. ३३ दिवस पदयात्रा झाली. ४१ दिवस अनुष्ठान झाले आता पुन्हा पाच दिवस हे कार्यक्रम चालणार आहेत यामुळे निश्चितच भक्तीचा सुरेख संगम पाहायला मिळत आहे. व्यासपीठावर कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा, खासदार डॉ.जयसिध्देश्वर महास्वामीजी, आमदार विजयकुमार देशमुख, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह विविध धर्मगुरूंची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना म्हेत्रे म्हणाले की, या सर्व कार्यक्रमांची सुरूवात पदयात्रेने झाली आहे. जगदगुरुंची श्रीक्षेत्र येडूरहून श्रीशैलपर्यंत पदयात्रा संपन्न झाली आहे.पदयात्रेच्या दरम्यान विविध गावांमध्ये धर्मजागृती,लिंगदिक्षा,व्यसनमुक्ती विषयक धर्मोपदेश, वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाले आहेत.धर्मप्रसाराचे महान कार्य पंचपीठाच्या माध्यमातून होत आहे. जगाच्या कल्याणासाठी व शांतीसाठी धर्मकार्याचे महत्त्व लाखमोलाचे ठरत आले आहे.यावेळीस श्रीशैल व काशी पिठाच्या जगद्गुरुंसह विविध धर्मगुरू व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

सद्यस्थितीत श्रीशैल येथे वीरशैव महासभेचे महाअधिवेशन,राष्ट्रीय वेदांत संमेलन,राष्ट्रीय वचन संमेलन,राष्ट्रीय वीरशैवागम समावेश आणि मराठी, तेलगू,कन्नड तसेच वीरशैव साहित्य गोष्टी, मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती म्हेत्रे यांनी दिली. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य धनेश अचलारे आदि उपस्थित होते.

 

वीरशैवांसाठी श्रीशैल येथे होणार मोठे हाॅस्पिटल

श्रीशैल पीठाचे धर्मकार्य आणि सामाजिक बांधीलकी जाणून आंध्र प्रदेश शासनाने दहा एकरची जागा देण्याचे कबूल केले असून पाच एकर जागा पीठाला हस्तांतरित झाली आहे. या जागेवर मोठे हाॅस्पिटल,कंबी मंटप,यात्री निवास आणि गुरूकुल पध्दतीने शाळेची निर्मीती करण्यात येणार आहे.

म्हेत्रे यांच्याकडून भक्तनिवासासाठी २५ लाखांची देणगी

श्रीशैल येथील धर्मपीठासाठी सोलापूर जिल्ह्यातून वर्षभर लाखो भाविक सतत ये – जा करत असतात. आपल्या जिल्ह्यातील भाविकांची तेथे राहण्याची सोय व्हावी यासाठी माजी मंत्री म्हेत्रे यांनी भक्त निवासाच्या निर्मितीसाठी लोकनेते स्व. सातलिंगप्पा म्हेत्रे व मातोश्री लक्ष्मीबाई म्हेत्रे यांच्या स्मरणार्थ २५ लाख रुपयांची देणगी अर्पण केली. 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!