वॉशिंगटन : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्या खासगी निवासस्थानी गोपनीय सरकारी दस्तावेज सापडल्यानं खळबळ उडाली आहे. या घडामोडीमुळं बायडन राजकीयदृष्ट्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. बायडन यांच्या घराच्या गॅरेजमध्ये हे गोपनीय दस्तावेज मिळाले आहेत. या ठिकाणी बायडन हे वीकेंड घालवण्यासाठी यायचे. त्याशिवाय कार्यालय असलेल्या वॉशिंग्टन थिंक टँकमध्येही काही कागदपत्रे सापडली आहेत.
विल्मिंग्टन, डेलवेअर येथील त्याच्या घरी सापडलेली कागदपत्रे बायडन हे उपराष्ट्राध्यक्ष असतानाच्या काळातील आहेत. खुद्द बायडन यांनी याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं असून तपासात संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. ही गोपनीय कागदपत्रे २००९ ते २०१६ या कालावधीतील आहेत. याची चौकशी करण्यासाठी यूएस अॅटर्नी जनरल मेरिक गारलँड यांनी रॉबर्ट हर या विशेष वकिलाची नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे.
या घडामोडींनंतर बायडन बचावात्मक पवित्र्यात आहेत. ‘या गोपनीय कागदपत्रांमध्ये नेमकं काय आहे याची कल्पना मला नाही. माझ्या खासगी निवासस्थानी सरकारी दस्तावेज कसे आले, याबद्दल मलाही माहीत नाही. मात्र, चौकशीला मी पूर्ण सहकार्य करेन, असं बायडन यांनी म्हटलं आहे