पक्षनाव शिवसेना अन् धनुष्यबाण चिन्हावर आता शुक्रवारी होणार सुनावणी, ठाकरे – शिंदे गटाचे युक्तिवाद पूर्ण
दिल्ली : शिवसेना पक्षनाव अन् धनुष्यबाण चिन्हाबाबत पुढील सुनावणी शुक्रवारी २० रोजी होणार आहे. दोन्ही गटाचे युक्तीवाद ऐकूण घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे.मात्र शिवसेना गटाने शिवसेना संघटनात्मक निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी केली आहे. आज दुपारी निवडणूक आयोगासमोर ४ वाजता सुनावणीला सुरुवात झाली.
उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करतांना म्हटले कि, शिवसेना हि उद्धव ठाकरे यांचीच असल्याचे म्हटले आहे. आमदारांच्या निलंबनाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असून न्यायालयाचा निर्णयापर्यंत कोणताही निर्णय देऊ नका, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाकडे केली. तसेच शिंदे गटाने सादर केलेली कागदपत्रे खोटी असल्याचेही सिब्बल म्हणाले. शिंदे गटाच्या कागदपत्रांची सत्यता तपासण्यासाठी ओळखपरेड करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली आहे. तसेच शिंदे गटाचे आमदार धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले, असेही ते म्हणाले.
दरम्यान उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत २३ जानेवारी रोजी संपणार आहे. त्यामुळे संघटनात्मक निवडणुकीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नावाबाबत लवकरात लवकर निर्णय द्यावा, अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली. शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेली कागदपत्रे खोटी असल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी युक्तीवादादरम्यान केला होता. हा दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी खोडून काढला. शिंदे गटाच्या कागदपत्रात कोणत्याही त्रुटी नाहीत, असे महेश जेठमलानी यांनी यावेळी बोलताना सांगितले.