नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याचे मार्गदर्शक देवल सहाय यांचे आज मंगळवारी निधन झाले. रांची येथील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देवल यांनी धोनीला सुरूवातीच्या काळात मदत केली होती. देवल हे बिहार क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष होते. गेल्या तीन महिन्यांपासून ते आजारी होते.
१९९७-९८ साली सेंट्रल कोलफील्ड लिमिडेटचे चेअरमन असताना देवल सहाय यांनी धोनीला स्टायपेंडवर ठेवले होते. त्यांनी धोनीला १९९७-९८ या काळात स्टायपेंडवर ठेवले होते. धोनीने क्रिकेट विश्वात गाठलेली उंची मागे सहाय यांची महत्त्वाची भूमिका होती. देवल सहाय यांना रांची क्रिकेटचे भीष्म पितामह म्हटले जात असे. ते स्वत: क्रिकेटपटू आणि फुटबॉलपटू होते. सहाय हे सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेडच्या निर्देशकपदावरून निवृत्त झाले. २००६ नंतर त्यांनी क्रीडा प्रशासनातून स्वत:ला वेगळे केले. त्याच्या निधनावर झारखंड राज्य क्रिकेट संघटना आणि अन्य संघटना तसेच क्रिकेट प्रेमींनी शोक व्यक्त केला.