दिल्ली : कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने सात सदस्यीय समितीचे गठण केले आहे. मेरी कोम या समितीच्या प्रमुख असतील. तर अलकनंदा अशोक उपाध्यक्ष असतील. सदस्यांमध्ये डोला बॅनर्जी, योगेश्वर दत्त, सहदेव यादव आणि दोन वकिलांची नावे आहेत.
आयओए अध्यक्षांनी एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की IOA कार्यकारी परिषदेची तातडीची बैठक सायंकाळी ऑनलाइन बोलावण्यात आली होती, विनेश फोगट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, रवी दहिया आणि दीपक पुनिया या पाच खेळाडूंच्या तक्रार पत्रांवर बैठकीत चर्चा झाली. या बैठकीला IOC अॅथलीट्स कमिशनचे सदस्य अभिनव बिंद्रा आणि शिवा केशवन यांच्यासह विशेष निमंत्रित उपस्थित होते.
महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा २०१३ नुसार समिती स्थापन करून दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घ्यावे, असा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघ आणि त्याचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना ७२ तासांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते. मात्र, शुक्रवारी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या वतीने जबाब नोंदवण्यात आला आहे. ब्रिजभूषण यांचा मुलगा प्रतीक भूषण सिंह याने याबाबत माहिती दिली आहे.