मुंबई : कोरोना संकटात भाजपकडून राज्यात आंदोलनं केली जात आहे. दरम्यान, यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एक मागणी केली आहे. कोरोना परिस्थितीत जनतेच्या जीवाशी खेळणारे राजकारण केले जाऊ नये आणि तशी स्पष्ट समजच राजकीय पक्षांना द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे.
करोनाची लाट पुन्हा येत आहे, अशा परिस्थितीत केंद्राच्या सूचनेनुसार तसेच योग्य त्या सावधतेने आम्ही जनजीवन पूर्वपदावर आणत आहोत मात्र, काही राजकीय पक्ष जनतेच्या जीवाशी खेळत आरोग्याचे नियम मोडत रस्त्यावर उतरून राजकीय आंदोलने करीत आहेत. त्यांना परिस्थितीची कल्पना देऊन योग्य ती समज द्यावी, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये केली.
महाराष्ट्रात विविध मुद्द्यांवर विरोधी पक्ष भाजप तसेच अन्य पक्षांकडून वारंवार आंदोलने करण्यात येत आहेत. त्याकडेच एकप्रकारे मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचे आज लक्ष वेधले आहे.महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी २४ हजार रुग्ण दररोज सापडायचे. तिथे आता ४७०० ते ५००० रुग्ण दररोज आढळत आहेत. रुग्णसंख्या कमी होत असली तरी आम्ही राज्यातील जनतेला गाफील न राहण्याच्या आणि त्रिसूत्रीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी देशातील सर्व राजकीय पक्षांची एक बैठक घेऊन परिस्थितीचे गांभीर्य त्यांना समजावून सांगावे व राजकारण न करता उपाययोजनांत सहकार्य करण्याच्या सूचना द्याव्यात. आज एकीकडे आम्ही करोनाला रोखण्यासाठी सुरक्षित अंतर, मास्क घालणे हे आवाहन करीत असून दुसरीकडे राजकीय पक्ष रस्त्यावर उतरून राजकारण करीत आहेत, त्यामुळे आमचे सर्व प्रयत्न असफल होऊ शकतात व दुसऱ्या करोना लाटेला आमंत्रण मिळू शकते,’ अशी भीती मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली.