ग्रीनफिल्डचा वाद पेटला;आक्रमक शेतकरी भेटले गडकरींना:जिल्हाधिकारी व आमदारांना घेऊन मला संपर्क साधण्यास सांगा ; गडकरींचे स्पष्टीकरण
अक्कलकोट,दि.२६ : प्रतिनिधी : बहुचर्चित चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड हायवेच्या भूसंपादनात बाधित शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला दिल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रविवारी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे जाऊन भेट घेतली.दर ठरवण्याचा अधिकार जिल्हा प्रशासनाचा असून त्या संदर्भात आमदार व जिल्हाधिकारी यांना मला संपर्क साधण्यास सांगा असे स्पष्टीकरण यावेळी नितीन गडकरी यांनी केले.
रविवारी अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील ३३ लोकांचे शिष्टमंडळ नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीस गेले होते.संतप्त शेतकऱ्यांनी थेट गडकरींचे संपर्क साधला यावेळी गडकरींनी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या.जिरायतीसाठी पाच लाख तर बागायतीसाठी एकरी सात लाख रुपये हा दर आम्हाला परवडणार नाही.तुम्हीच आमचे मायबाप आहात यामध्ये आम्हाला न्याय द्या अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी गडकरींकडे केली.या शिष्टमंडळात मैंदर्गी, दुधनी,मिरजगी,कासेगाव, तांदुळवाडी,खडकी आदी गावातील शेतकऱ्यांचा समावेश होता.या शेतकऱ्यांनी अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुटुंब हे शेतकऱ्यांच्या असून त्यांची शेती गेल्याने आयुष्य बरबाद होण्याची भीतीही गडकरींसमोर व्यक्त केली.या शिष्टमंडळात बसवराज होळीकट्टी,अमोल वेदपाठक,सादिक बांगी,शिवयोगी ठक्का,सोमलिंग निंबाळ,
विक्रम गाढवे,प्रवीण हिरतोट, भीमसेन देडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.या शेतकऱ्यांनी गडकरींसमोर आम्हाला न्याय द्या, बाजारभावाच्या पाचपट रक्कम द्या अशा मागण्यांची बॅनरबाजी केली.
आम्ही मोबदला देऊ,पण…
दरम्यान नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी गेले होते.त्यांना उत्तर देताना गडकरी म्हणाले की भूसंपादनात आम्ही आजपर्यंत शेतकऱ्यांना मोबदला दिलेलाच आहे.मात्र जमिनीचे दर ठरवण्याचा अधिकार संबंधित जिल्हाधिकारी व राज्य सरकार यांची आहे.ते आम्हाला जो दर कळवतात त्यानुसार आम्ही मोबदल्याची रक्कम निश्चित करत असतो म्हणून मोबदल्याची रक्कम जर कमी असेल तर याविषयी सोलापूरचे जिल्हाधिकारी,आमदार सुभाष देशमुख,आमदार सचिन कल्याणशेट्टी,संघर्ष समिती यांची बैठक लावून त्यांना माझ्याशी संपर्क साधायला सांगा असे आवाहनही गडकरी यांनी यावेळी केले.
आम्ही मागे हटणार नाही
शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला जाहीर करून शासनाने शेतकऱ्यांच्या आयुष्यावर संकट आणले आहे. ही बाब नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सांगितले आहे. त्यानंतर गडकरींनी सांगितल्याप्रमाणे जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, आमदार व संघर्ष समितीची बैठक लावू. मात्र शेतकऱ्यांना समाधानकारक मोबदला मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही.
बसवराज होळीकट्टी (चेन्नई सुरत हायवे संघर्ष समिती, अक्कलकोट)