अक्कलकोट, दि.२८ : मराठी साहित्यामुळे मराठी भाषेच्या समृद्धी मध्ये भर पडत आहे. मराठी राजभाषा दिन हा मराठी भाषेचे महत्त्व सांगणारा आहे. मराठी भाषेचा वापर सर्व प्रथम पालकांनी केला पाहिजे म्हणजे आपोआपच पालकांचे अनुकरण विद्यार्थी करतील, असे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी पदमाकर कुलकर्णी यांनी भाषणात सांगितले. अक्कलकोट येथे शासकीय निवासी शाळा व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाखा अध्यक्षा शैलशिल्पा जाधव होत्या.
जगामध्ये मराठी भाषा ही क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर आहे. मराठी भाषेचा वापर दैनंदिन जीवनात करणे महत्त्वाचे आहे. मराठी आपली मायबोली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले पाहिजेत. असे याप्रसंगी सौ.जाधव यांनी भाषणात सांगितले. राज्याच्या सीमेवरील तालुक्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने मराठी भाषेच्या संवर्धनाचे काम चालू आहे, असे मुकुंद पत्की यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रमुख कार्यवाह दिनकर शिंपी, मुख्याध्यापिका मृणाली करजगीकर, लक्ष्मण पाटील, मुकुंद पत्की, सुभाष सुरवसे, दत्तात्रय बाबर, सुधीर जरीपटके, अमित कुलकर्णी, भाग्यलक्ष्मी मुत्तगी, अफरोज नाईकवाडी,स्नेहा नरके आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन राजु भोसले यांनी केले. आभार प्रदर्शन मृणाली करजगीकर यांनी केले.