पुणे : कसबा पोटनिवडणुकीमध्ये विजयी गुलाल उधळलेले नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. धंगेकर यांनी पुण्यातील निवसस्थान, मोदी बागयेथे शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला एकत्र ठेवण्याची जबाबदारी घेतली जाईल, असे म्हटले. त्याचबरोबर लोकांना बदल हवा आहे. लोकांची इच्छा आहे की आम्ही एकत्रित राहावे, असेही पवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात भाजपने बापट यांच्या सल्ल्याने निर्णय घेतले नाहीत अशी कुजबूज ऐकायला आली. भाजपने बापट आणि टिळकांना डावलून जे निर्णय घेतले त्याचे परिणाम होतील, कदाचित त्याचा फायदा होईल अशी शंका होती.
निवडणूक झाल्या नंतर मी माहिती घेतली. ज्या व्यक्तीला लोकांनी निवडून दिले ती व्यक्ती वर्षा नुवर्ष सामान्य लोकांच्या कशाचीही अपेक्षा न करता काम करणारी होती. हा उमेदवार चार चाकीत कधी बसला नाही. दोन चाकीत बसला. त्यामुळे दोन पाय असलेल्या मतदारांचे सर्वांचे लक्ष यांच्याकडे होते. त्यामुळे त्याचा लाभ होईल हे माहीत होते.
या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष मनापासून राबले. तसेच धंगेकर यांची मेहनत यामुळे हा फायदा झाला, असेही ते म्हणाले. दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला एकत्र ठेवण्याची जबाबदारी घेतली जाईल. एकत्र लढण्यावर भर देऊ. लोकांना बदल हवाय. लोकांची इच्छा आहे की आम्ही एकत्रित राहावे, असेही पवार म्हणाले.