यशवंत पंचायत राज अभियानात अक्कलकोट पुणे विभागात प्रथम ; कर्मचाऱ्यांनी केला गटविकास अधिकाऱ्यांचा सत्कार
अक्कलकोट : शासनाच्या यशवंत पंचायत राज अभियान २०२२-२३ मध्ये पुणे विभागात अक्कलकोट पंचायत समितीने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.यानिमित्ताने कर्मचारी वर्गाने मोठा आनंदोत्सव साजरा केला. यात गटविकास अधिकारी सचिन खुडे यांचे जल्लोषात स्वागत करून त्यांचा अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला.
ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठीच्या योजना पंचायतराज संस्थेमार्फत राबविल्या जातात. यासाठी राज्यात पंचायतराज संस्थांमधून प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी हे पुरस्कार घोषित केले जातात. शाश्वत विकास ध्येय अंतर्गत १७ उद्दिष्टे आणि ९ संकल्पना यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत समित्यांची विभाग स्तर आणि राज्य स्तरावर निवड करून राष्ट्रीय पंचायत दिनी पुरस्कार देऊन गौरविले जाते. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद, सोलापूर अंतर्गत पंचायत समिती, अक्कलकोटने सर्वोच्च गुण मिळवत पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळवला.
यशवंत पंचायतराज अभियानामध्ये पंचायत समितीला त्यांच्या अख्यातरित येणाऱ्या सर्व विभागांच्या कामकाज संबंधाने प्रश्नावली दिली गेली होती. यामध्ये केलेल्या कामाच्या अनुषंगाने स्वयं मूल्यांकन झाले. त्यानंतर जिल्हा परिषद सांगली यांच्या मार्फत पुन्हा तपासणी होऊन हा निकाल जाहीर करण्यात आला. अन्य जिल्हा परिषदेच्या तपासणीनंतर देखील पुणे विभागात सर्वोच्च गुण पटकाविल्यामुळे अक्कलकोट पंचायत समितीला पुणे विभागात प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.
यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याशिवाय पंचायत समिती स्तरावरील सर्व विभाग प्रमुख, अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्य विसरता येणार नाही. यापुढे चांगले काम करू, असे गट विकास अधिकारी सचिन खुडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.