मुंबई : महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी ठाकरे गटाची साथ सोडली आहे. त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईत बाळासाहेब भवन येथे त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील आपली भूमिका मांडली. “आज माजी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यांनी मंत्री असताना पालघर, मेळघाट, राज्यातील इतर जिल्हे असतील कुपोषण कमी करण्यासाठी अगदी खेड्या-पाड्यात जावून दुर्गम भागात काम केलं. त्याचा परिणामदेखील त्यावेळेस पाहायला मिळालं. टेलिमेडिसन ही संकल्पना त्यांचीच होती. दुर्गम भागातही उपचार व्हायला पाहिजे ही संकल्पना त्यांनीच मांडली आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये ज्या काही अडचणी आणि ऋटी आहेत त्या निदर्शनास आणून देणं आणि त्यावर उपाययोजना करणे याबाबत त्यांनी मोठं काम केलं”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, दीपक सावंत यांनी आरोग्यमंत्री असताना देखील राज्यभरामध्ये सर्वसामान्य रुग्ण, नागरिकांना आपल्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून मोठी सेवा केली. अतिशय कमी बोलणारे, पण जास्तीचं काम करणारे म्हणून दीपक सावंत यांची ओळख आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन आम्ही पुढे जातोय. गेल्या सहा-सात महिन्यांत राज्य सरकारने केलेलं काम त्यांनी जवळून पाहिलं आहे. त्यांनादेखील काम करण्याची आवड आहे. ही आवड कुणाला थांबवू शकत नाही. दीपक सावंत हे बाळासाहेबांचा डॉक्टरही होते. त्यांच्या सानिध्यात काम करण्याचं भाग्य त्यांना मिळालं. काम करण्याची इच्छा असताना सुद्धा त्यांना दुर्देवाने काम थांबवावं लागलं. कम्पलसरी रियारमेंट देण्यात आलं. पण काम करणारं माणूस थांबत नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.