ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे लागेन ; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा

मुंबई | महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. त्याचा पहिला प्रोमो  राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. दरम्यान, या प्रोमोमध्ये  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता अगदी जबरदस्त शैलीत भाजपवर निशाणा साधला आहे. जास्त अंगावर याल तर मी हात धुवून मागे लागू शकतो असा सूचक इशारा देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला आहे.

उघडपणे आणि निर्लज्जपणे महाराष्ट्रात हे अघोरी प्रयोग सुरु झाले असं संजय राऊत यांनी विचारलं आहे. यावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात की, आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंबं आणि मुलंबाळं आहेत, त्यांना सांगू इच्छितो की तुम्हालाही कुटुंबं आणि मुलंबाळं आहेत. तुम्हीही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ते आम्ही शिजवू शकतो, असं ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहे.


उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाइव्हवर विरोधक सातत्यानं टीका करत असतात. तोच धागा पकडून, ‘मुख्यमंत्री हे हात धुवा असं सांगण्यापलीकडं काय करतात’, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. त्यावर बोलताना, ‘हात धुतो आहे. जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे लागेन,’ असं उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

तुमच्या जीवनात वर्षभरात काय बदल झाले? महाराष्ट्र आत्मनिर्भर कधी होणार? अशा प्रश्नांची उत्तरे देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली आहेत. राऊतांनी ट्वीट केलेल्या या प्रोमोमुळं मुलाखतीची उत्सुकता वाढली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!