ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लोकसहभाग हा ग्रामीण विकासाचा आत्मा आहे: दिलीप स्वामी; चिंचणी येथे समृद्ध गाव अभियान कार्यशाळेचे उद्घाटन 

 

सोलापूर : योग्य नियोजन आणि लोकसहभाग यांच्या माध्यमातूनच ग्रामीण भागाचा विकास वेगाने आणि परिणामकारकरीत्या होईल असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दिलीप स्वामी यांनी शनिवारी चिंचणी येथे बोलताना केले.

सोलापूर सोशल फाउंडेशन आणि चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर तालुक्यातील चिंचणी या कृषी पर्यटन क्षेत्रात आयोजित करण्यात आलेल्या समृद्ध गाव अभियान कार्यशाळेचे उद्घाटन करताना श्री स्वामी बोलत होते. सोलापूर जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेचे अध्यक्षस्थान सोलापूर सोशल फाउंडेशन चे संस्थापक आमदार सुभाष देशमुख यांनी भूषवले होते.

या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना  दिलीप स्वामी यांनी उत्तम लोकसहभागातून यशस्वी झालेल्या काही योजना आणि उपक्रमांची माहिती दिली. गावाचा शाश्वत विकास करायचा असेल तर पुढच्या पिढीचा विचार करून शाळांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे सांगितले. बालविवाहांच्या बाबतीत सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात आघाडीवर आहे ही अतिशय कटू वस्तुस्थिती आहे असे सांगताना त्यांनी या जिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त असल्याचे विशद केले.

आपल्या गावात उपायोजना करताना केवळ व्यसनमुक्ती न करता व्यसनाच्या मूळ कारणांचा विचार केला पाहिजे आणि त्यावर घाव घातला पाहिजे, असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  गजानन भाकरे यांनी केले तर समृद्ध गाव समिती अभियान समितीचे अध्यक्ष मोहन अनपट यांनी चिंचणीच्या विकासाची सविस्तर माहिती दिली.

प्रभारी जिल्हाधिकारी  तुषार ठोंबरे आणि अतिरिक्त जीएसटी आयुक्त  सौ.वैशाली पतंगे- ठोंबरे यांनीही उपस्थित सरपंचांना मार्गदर्शन केले. ठोंबरे यांनी, ग्रामीण भागातल्या पर्यावरण प्रेमी उत्पादनांना शहरांमध्ये चांगली मागणी असल्याचे सांगितले.

ठोंबरे यांनी, सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांच्या कल्पनांचा समावेश करून पूर्ण जिल्ह्याचा एक विकासाचा कृती आराखडा तयार करण्यात येईल असे जाहीर केले. या कार्यशाळेत पंढरपूरचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे, सांगोल्याचे गटविकास अधिकारी आनंद लोकरे, कृषिभूषण अंकुश पडवळे, पर्यटन तज्ञ रफिक नदाफ, ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी, यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विजय कुचेकर यांनी केले.

 

… तर गावात झपाट्याने परिवर्तन होईल:आ. देशमुख

आमदार सुभाष देशमुख यांनी, अध्यक्षीय समारोप केला. सरपंच हाच गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू असतो. त्यामुळे सरपंचांनी निर्धार केला तर गावात झपाट्याने परिवर्तन होईल, असे  प्रतिपादन केले.या कार्यशाळेस सोलापूर सोशल फाउंडेशन चे मुख्य समन्वयक विजय पाटील,विपुल लावंड यांच्यासह जिल्ह्यातील सरपंच, सदस्य, सल्लागार, प्रतिनिधी उपस्थित होते.

चिंचणी : रम्य पर्यटन स्थळ

पंढरपूर तालुक्यातील चिंचणी हे गाव पुनर्वसित असून ते उत्तम कृषी पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित झाले आहे. सध्या या स्थळाच्या ठिकाणी विविध संस्था संघटनांचे कार्यक्रम संमेलने आणि बैठका मोठ्या प्रमाणावर होत आहेत. भरपूर वृक्षारोपण केलेल्या या ठिकाणी रम्य वातावरणात सर्व सुख सोयी उपलब्ध असल्याने यावर्षी चिंचणीच्या पर्यटन स्थळामुळे महिलांना रोजगार निर्मिती झाली आहे अशी माहिती श्री. मोहन अनपट यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!