सोलापूर दि. १९- ( प्रतिनिधी ) येथील हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर येत्या बुधवारी (२१ जून) सकाळी ७ ते ८ या वेळेत योग दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती पतंजली योग समितीच्या महिला वरिष्ठ राज्य प्रभारी तसेच कार्यक्रमाच्या प्रात्यक्षिक समन्वयक सुधा अळ्ळीमोरे यांनी दिली.
शासकीय यंत्रणा, पतंजली योग , योग सेवा मंडळ ,विवेकानंद केंद्र, योग असोसिएशन सोलापूर ,योग साधना मंडळ ,आर्ट ऑफ लिव्हिग, भारतीय योग संस्था, श्रीरामचंद्र मिशन, योग परिषद तसेच हार्टफुलनेस आदींच्या संयुक्त विद्यमाने या योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.मानवतेसाठी योग अशी यंदाची थीम असल्याचेही अळ्ळीमोरे यांनी सांगितले.
भारतीय प्राचीन संस्कृतीत योग साधनेला मोठे महत्त्व आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तंदुरुस्त ठेवू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग. योग केल्यामुळे मनावरही चांगले संस्कार घडतात. योग आणि प्राणायाम केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. योगामुळे एकाग्रतेमध्ये सुधारणा होते .योग साधना केल्यामुळे आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम दिसून येतात .शिवाय निरोगी जीवनशैलीकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले जाऊ शकते. हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा योगासन अत्यंत महत्त्वपूर्ण असे मानले गेले आहे .योगामुळे शरीराला आराम तर मिळतोच शिवाय चांगली झोपसुद्धा येते. यासाठी प्रत्येक व्यक्तीने दररोज काही मिनीटे योग साधना करणे अत्यंत गरजेचे आहे, असेसुद्धा अळ्ळीमोरे यांनी सांगितले.