ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पवार साहेब तुम्ही कराल तर मुत्सद्देगिरी आणि शिंदेंनी केले तर गद्दारी? हा कुठला न्याय: देवेंद्र फडणवीस 

ज्यांच्या आलमारीत सांगडे, त्यांनी सावकरीचा आव आणायचा नसतो; उद्धव ठाकरेंवर टीका

चंद्रपूर, 25 जून : 1978 मध्ये वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातून शरद पवार आमदार घेऊन बाहेर पडले आणि भाजपसोबत मुख्यमंत्री झाले. त्यांनी केली तर ती मुत्सद्देगिरी आणि तेच शिंदे यांनी केले तर गद्दारी? हा कुठला न्याय, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विचारला.

केंद्रातील मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त न्यू इंग्लिश स्कुल मैदान, चंद्रपूर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आणि इतरही नेते उपस्थित होते. अडीच वर्ष तुम्ही 100 कोटींची वसुली करणारे, फेसबुकवर असलेले, घरी बसलेले सरकार पाहिले, आता खऱ्या अर्थाने जनतेचे सरकार आले आहे, असे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले, काल मी पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीला परिवारवादी म्हटले तर उद्धव ठाकरे यांना मिरची झोंबली. पण उद्धवजी, ‘तुमको मिर्ची लगी तो क्या करू?’ मी काचेच्या घरात राहत नाही, तुम्ही राहता, त्यामुळे माझ्या नादी लागू नका. ज्यांच्या आलमरीत सांगाडे पडले आहेत, त्यांनी सावकारीचा आव आणायचा नसतो. ते सांगाडे बाहेर निघाल्याशिवाय राहणार नाही. मी कधी कुणाच्या भानगडीत पडत नाही आणि पडलो तर सोडत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक उपलब्धी आहेत. पण सर्व परिवारवादी पक्ष एकत्र आणले, ही सुद्धा एक उपलब्धीच म्हणावी लागेल. या सर्व परिवारवादी पक्षांना चिंता कुटुंबाची. आणि ज्यांचा परिवार संपूर्ण देश आहे, ते आहेत नरेंद्र मोदी. बरे या या बैठकीत ठराव काय झाला तर राहुल गांधी यांची दाढी करा आणि त्यांचे लग्न करा, अशी टीका सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर गेले, त्या अमेरिकेतील त्यांचे भव्य स्वागत संपूर्ण जगाने पाहिले आणि दुसरीकडे राहुल गांधी अमेरिकेत जाऊन भारत कसा वाईट, यावर व्याख्याने देतात. त्यांनी भारतात लोकशाही नाही, असे सांगितले आणि त्यावर अमेरिकेनेच खुलासा करून सांगितले की भारतात लोकशाही आहे आणि ती समृद्ध सुद्धा होते आहे. खरे तर काँग्रेसला लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही, आजचाच दिवस आहे, ज्यादिवशी इंदिरा गांधी यांनी लोकशाहीची हत्या केली होती, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!