ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आषाढीनिमित्त गान-श्रवणभक्तीत सोलापूरकर तल्लीन…पंडित दीपक कलढोणे यांचे अभंगगायन

सोलापूर दि.२९- येथील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक दीपक कलढोणे यांच्या गायनाने सोलापूरकरांना प्रतिवर्षीप्रमाणे श्रवणभक्तिचा सुंदर अनुभव मिळाला. कलढोणे यांनी २००७ साली हाती घेतलेल्या संतसाहित्य प्रचारार्थ अभंगगायनाच्या उपक्रमाचे यंदाचे १७ वे वर्ष भक्तिपुष्प संपन्न झाले.

श्लोकगायन व जय जय रामकृष्ण हरी या
भागवत सांप्रदायाच्या मूलमंत्रच्या गायनाने सुरूवात झाली, सभागृहावर पुरिया धनाश्रीचे सायंकाळचे स्वर पसरत गेले, श्रोत्यांची ब्रम्हानंदी टाळी लागली आणि नवविधाभक्तीतील श्रवणभक्तीचा आनंद मिळाला.जुळे सोलापुरातील गोविंदश्री सभागृहात संपन्न झालेल्या या सोहळ्यासाठी सभागृह भरगच्च भरले होते. संत नामदेव राय यांची आधी रचिली पंढरी, मग वैकुंठनगरी,संत चोखामेळा यांचा अबीर गुलाल, संत जनाबाईंचा संत भार पंढरीत आदि पं.जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेल्या अभंगरचना गाईल्यानंतर कलढोणे यांनी संगीतबद्ध केलेल्या कांही रचना सादर केला. त्यातील संत कबीरांच्या भजो रे भैय्या, राम गोविंद हरी या लोकधुनेवर आधारीत रचनेला रसिकांनी दाद दिली. संत एकनाथांच्या दोन गवळणीही त्यांनी सादर केल्या. धरूनी फेर हरीभोवती, गोपी झाल्या दंग, या कलढोणे यांनीच संगीतबद्ध केलेल्या गौळणीतील हरीचरणासी मिठी मारिली,
या ओळीत भक्तिरस कळसास पोहोचला. देवाचा देव बाई ठकडा व कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर या
भक्तिगीताने अमृताची फळे या कार्यक्रमाची सांगता झाली.
त्यांना साथसंगत हार्मोनियम व स्वरसाथ नीरज कलढोणे, वर्धराज मिर्जी, व्हायोलीन जयंत जोशी, तबला प्रसाद कुलकर्णी, मृदंग देवेंद्र अयाचित, तालवाद्य नंदकुमार रानडे, महेश जाधव, मल्लिकार्जून कोरे, तानपुरा – निरंजनी कलढोणे, मयुरी बहिरट-केतकर यांनी केली. निवेदन अरविंद जोशी यांनी केले होते.
दुर्वांकुर चॅरिटेबल ट्रस्ट, सोलापूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याची सुरूवात, बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय व्यवस्थापक संजय वाघ, सो.म.पा.स्थायी समितीचे माजी सभापती शिवलिंग कांबळे, उद्योजक महावीर गुंडाळे, संजय अजनसोंडकर, गिरीश माळवदे, डॉ. सुरेश व्यवहारे व डॉ. नयना व्यवहारे आदि मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल रखुमाईच्या पूजनाने करण्या़त आली. सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गुरूलिंग कन्नुरकर व शांता कन्नुरकर यांचा भक्तिप्रसार कार्याबद्दल कृतज्ञता सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन जगदीश पाटील यांनी केले, तर आभार सोनाली
बेडगनूर यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!