ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आ.प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत मराठी भवनचा आराखडा तयार ; सोलापूरच्या वैभवात भर पडेल – आ.शिंदे

 

सोलापूर,दि.१ : सोलापूरमध्ये मराठी भवन व्हावे यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते त्याला मूर्त स्वरूप आले असून आ. प्रणिती शिंदे यांच्या उपस्थिती मध्ये मंगळवार दि. 1 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीमध्ये मराठी भवन आणि शुभराय आर्ट गॅलरीचा आराखडा अंतिम स्वरूपात तयार करण्यात आला.
मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व्हावा तसेच मराठी भाषेबाबतचे विविध उपक्रम एकाच ठिकाणी व्हावेत यासाठी सोलापूरमध्ये मराठी भवन व्हावे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने आ. प्रणिती शिंदे यांना निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानंतर आ. प्रणिती शिंदे यांनी मंत्रालयस्तरावर पाठपुरावा करून सोलापूरमध्ये मराठी भवन व्हावे म्हणून निधी मंजुर करून आणला. त्यानंतर तातडीने सोलापूर शहरातील कलावंत, चित्रकार, मराठी साहित्यिक, कवी, आर्किटे्नट अशा नामवंतांची बैठक घेवून मराठी भवन उभारणीसाठी प्रयत्न सुरू केले मराठी भवनची इमारत कशी असावी त्यामध्ये काय काय सुविधा असाव्यात यासाठी सूचना घेतल्या आणि दिल्या. त्यानुसार अंतिम स्वरूपात आलेल्या आराखड्यावर चर्चा करण्यासाठी मंगळवार दि. 1 डिसेंबर रोजी बैठक घेण्यात आली त्यामध्ये आर्किटे्नट अमोल चाफळकर, आर्किटे्नट शशिकांत चिंचोळी यांनी तयार करून आणलेले आराखडे मांडले त्यावर सविस्तर चर्चा झाली आणि काही बदल करून त्याला अंतिम स्वरूप देण्याचा निर्णय झाला. मुळे हॉस्पिटल शेजारी असलेल्या शुभराय कला दालनाच्या जागेत मराठी भवन ची अद्ययावत तसेच वैविध्यपूर्ण अशी इमारत उभारणार असून त्यामध्ये शुभराय आर्ट गॅलरी नव्याने होणार आहे तसेच त्या इमारतीमध्ये मराठी भाषा संबधी विविध विभाग, कला दालनाचे विविध विभाग, कला प्रदर्शन दालन, सेमिनार हॉल, प्रशस्त पार्किंग अशा सर्व सोई सुविधांचा समावेश या मराठी भवनच्या इमारतीमध्ये करण्यात येणार आहे. नैसर्गिक साधन सामुग्री तसेच सुर्य प्रकाश, हवा याचा या इमारतीमध्ये पुरेपूर वापर होईल अशा पध्दतीने या मराठी भवनची रचना करण्यात येणार आहे. त्या आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यात आले. जनवात्सल्यमध्ये आ. प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला हास्यसम्राट प्रा.दिपक देशपांडे, प्रशांत बडवे, चित्रकार पुष्कराज गोरंटला, डोंगरी, शशिकांत धोत्रे, देवेंद्र निंबर्गीकर, धनंजय टाकळीकर, दया पटणेशिल्पकार धर्मराज रामपुरे, राजन रिसबूड, पराग शहा, जितेंद्र राठी, नगरसेवक विनोद भोसले, प्रदीप पिंपरकर, पत्रकार विनायक होटकर आदींसह चित्रकार, कलावंत उपस्थित होते. लवकरात लवकर या मराठी भवनच्या इमारतीचे काम सुरूहोणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या इमारतीलाल लागणारा निधी आलेला आहे त्यामुळे कसलीच अडचण यापुढे येणार नसून काम लवकर सुरू करण्याचे आदेशही आ. प्रणिती शिंदे यांनी दिले.

सोलापूरच्या वैभवात मराठी भवनच्या इमारतीने भर
पडेल – आ. प्रणिती शिंदे

मराठी भाषेची वृध्दी व्हावी आणि सोलापूरमधील उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी मराठी भवन आणि कला दालन तयार करण्यात येणार आहे. मराठी भवनमध्ये कलावंत चित्रकारांसाठी सर्व सोई सहज उपलब्ध होतील आणि एक कला कौशल्याने सजलेली इमारत भावी पिढीला पाहण्यास मिळेल अशीच रचना या इमारतीमध्ये करण्यात येणार असून सोलापूरच्या वैभवात मराठी भवनच्या इमारतीने भर पडणार आहे असे यावेळी आ. प्रणिती शिंदे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!