नवी दिल्ली : चित्रपट अभिनेते आणि भाजपाचे गुरूदासपुरचे खासदार सनी देओल यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मनालीला फिरायला गेले असताना त्यांना कोरोनाची लागण झाली, अशी माहिती आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी यांनी पीटीआयशी बोलताना दिली.
सनी देओल एक महिन्यापासून कुल्लू येथे राहत आहेत. सनी देओल यांना ताप आणि गळ्यामध्ये खवखव जाणवू लागली होती. मंगळवारी त्यांनी कोरोना टेस्ट केली होती. ती पॉझिटिव्ह आल्याचे मनालीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रणजित ठाकूर यांनी सांगितले.
सनी देओल यांनी मागील आठवड्यात मुंबईत आपल्या खांद्यावर शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर पीटीआयच्या वृत्तानुसार ते कुल्लूतील फार्म हाऊसमध्ये उपचार घेत होते. तर दुसरीकडे मंगळवारी गुजरातहून राज्यसभेवर नियुक्त केलेले खासदार अभय भारद्वाज यांचं चेन्नईत करोनामुळे निधन झालं. करोनाची लागण झाल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर होती. भारद्वाज यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.