नवी दिल्ली : मसाल्यांचा बादशाह म्हणून जाहिरातीतून प्रसिद्ध असलेले ‘एमडीएच’ मसाले या कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे निधन झाले आहे. ते ९८ वर्षांचे होते.
गुलाटी यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयामध्ये मागील तीन आठवड्यांपासून उपचार सुरु होते. त्यांना आज पहाटेच्या सुमारास कार्डिअॅक अरेस्टचा झकटा आला. त्यातच पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
महाशय धर्मपाल गुलाटी यांचा जन्म पाकिस्तानमधील सियालकोट येथे झाला होता. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले. त्यानंतर मसाल्यांचा उद्योग त्यांनी सुरु केला. आज भारतातच नव्हे तर जगभरात ‘एमडीएच’ मसाले हा एक मोठा नावाजलेला ब्रँड आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ‘महाशियां दी हट्टी’ ही मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन करणारी कंपनी ‘एमडीएच’ या नावाने प्रसिद्ध आहे.
चुन्नीलाल गुलाटी यांच्या अथक प्रयत्नांमुळे ‘एमडीएच’ कंपनीने मसाल्याच्या पदार्थांमध्ये बाजारात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारतात मसाल्यांच्या १५ कंपन्या आहेत. हजारच्या वर पुरवठादार आणि ४ लाख घाऊक विक्रेते एवढं मोठं जाळं एमडीएचने विस्तारलेलं आहे. अमेरिका, कॅनडा, जपान, संयुक्त अरब अमिरात, इंग्लंड, युरोप, दक्षिण पूर्व आशिया, सौदी अरेबिया आदी देशांत ६२ हून अधिक उत्पादनांची विक्री होते. अवघ्या १५०० रुपयांत सुरु झालेला हा व्यवसाय आज कोट्यांची उलाढाल करतोय. महाशय धरमपाल गुलाटी यांचे पुत्र राजीव गुलाटी आता व्यवसायाचा हा पसारा समर्थपणे पुढे नेत आहेत.
२०१९ साली गुलाटी यांना देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच पद्म विभूषण प्रदान करुन सन्मानित करण्यात आले होते. गुलाटी हे त्यांच्या वैयक्तिक कमाईतील ९० टक्क्यांहून अधिक हिस्सा दान म्हणून द्यायचे. यापूर्वीही अनेकदा गुलाटी यांच्या मृत्यूसंदर्भातील अफवा इंटरनेटवर व्हायरल झाल्याचे पहायला मिळाले होते. काही महिन्यांपूर्वीच गुलाटी यांच्या निधानाचे वृत्त सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर त्यांनीच आपली प्रकृती ठणठणीत असल्याचे पत्रक काढून सांगितले होते.