सोलापूर : कोरोना लसीकरणाबाबत जिल्हा व तालुकास्तरावर कृती दलांची स्थापना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.
श्री. शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एचआरसीटीसी चाचणी आणि कोविड-19 लसीकरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, महानगरपालिकचे उपायुक्त धनराज पांडे, मनपाचे आरोग्य अधिकारी बिरूदेव दुधभाते आदी उपस्थित होते.
कोरोनाबाबत लसीकरण करणाऱ्या शासकीय आणि खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी त्वरित तयार करावी. त्यांचे प्रशिक्षण आयोजित करावे, लस कोणाला द्यायची याचीही माहिती द्यावी, अशा सूचना श्री. शंभरकर यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या. कोरोनाची लस प्रथमत: शासकीय आणि खाजगी आरोग्य कर्मचारी, प्रयोगशाळेतील कर्मचारी, अधिकारी यांना देण्यात येणार असून त्याप्रमाणे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्ह्यात काही दवाखाने हाय रिझॉल्यूशन कॉम्प्युटराईज्ड टोमोग्राफी (एचआरसीटीसी) चाचणी कोविड-19 निदानासाठी करीत आहेत. मात्र याची माहिती स्थानिक प्रशासनाला होत नाही. एचआरसीटीसी चाचणीची माहिती स्थानिक प्रशासनाला देणे बंधनकारक असल्याचे श्री. शंभरकर यांनी सांगितले.
श्री. शंभरकर म्हणाले, कोरोना सदृश्य आजार आहे, त्यांचीच एचआरसीटीसी चाचणी करावी. जेणेकरून इतरांना कोरोनाची बाधा होणार नाही. कोणत्याही कोरोना सदृश्य व्यक्तीला प्रथम आरटीपीसीआर किंवा रॅपिड अँटीजेन टेस्ट करून एचआरसीटीसी चाचणीसाठी संदर्भित करावे. जिल्ह्यातील प्रत्येक प्रयोगशाळेला या चाचणीबाबत माहिती देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.