मुंबई दि २३: पांढरकवडा वनक्षेत्रातील दहशत माजविणाऱ्या वाघिणीला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज शिताफीने जिवंत पकडले याबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सबंधित वन अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी आदेश दिल्यापासून ३६ तासांत तिला पकडण्यात आल्यामुळे गावकऱ्यामध्येही समाधान व्यक्त होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनपरिक्षेत्रातील परिसरात दहशत माजविलेल्या वाघिणीने गेल्या २ महिन्यात या भागातील माणसे, जनावरे यांच्यावर हल्ले केले होते. मुख्यमंत्र्यांनी स्वत: याची दखल घेऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांना या वाघिणीस जिवंत पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्याप्रमाणे वन विभागाने सापळा लावून तिला पकडले. या वाघिणीला नागपूर येथे अस्थायी उपचार केंद्रात हलविण्यात आले आहे.
या वाघिणीचा अंधारवाडी, वासरी, कोपामांडवी, कोब्बई परिसरात संचार होता आणि तिने हल्लेही करावयास सुरुवात केली होती. यामध्ये एक जण जखमी तर एका महिलेचा मृत्यू ओढविला होता. तर जनावरेही मारली होती. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या सूचनेनुसार मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धतीनुसार समितीची एक बैठकही पार पाडण्यात आली होती त्याप्रमाणे पांढरकवडा वन विभागाच्या पथकांनी पथके तयार करून शोध सुरु केला होता. या परिसरात २९ कॅमेरे देखील लावण्यात आले होते. दरम्यान ४ सप्टेंबर रोजी मौजे वासरी येथे सुभाष कायतवार या शेतकऱ्यावर पाठलाग करून हल्ला करून या वाघिणीने त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर १९ सप्टेंबर रोजी अंधारवाडी येथील लक्ष्मीबाई दडाजे या महिलेवर हल्ला केला, त्यात दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.
मानद वन्य जीव रक्षक डॉ रमजान विराणी यांनी सादर केलेल्या कॅमेरा फुटेजमध्ये तसेच इतर कॅमेऱ्यात आलेल्या चित्रीकरणात या वाघिणीचा वावर दिसला. हि वाघीण T-T2C1 असल्याचे लक्षात आले. या सर्व हल्ल्यांमध्ये हीच वाघीण कॅमेरा चित्रीकरणात आढळली. या वाघिणीचे अस्वाभाविक वर्तन पाहता तसेच शेतीचा हंगाम असल्याने मानव वन्य जीव संघर्षाची शक्यता लक्षात घेऊन या वाघीणीस तत्काळ बंदिस्त करण्याची कार्यवाही करण्यास मुख्य वन्य जीव रक्षक तथा प्रधान मुख्य वन संरक्षक नितीन काकोडकर यांनी मान्यता दिली त्याप्रमाणे तिच्यावर पाळत ठेवून बेशुद्ध करून जेरबंद करण्यास पथकांना यश आले.