अहमदनगर : शिर्डी देवस्थानकडून ड्रेसकोडसंबंधी लावण्यात आलेल्या बोर्डविरोधात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आक्रमक झाल्या आहेत. तृप्ती देसाई यांनी शिर्डीत येऊन साई संस्थानाने लावलेला आवाहनाचा फलक काढण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार तृप्ती देसाई पुणे येथून शिर्डीसाठी रवाना झाल्या आहेत. मात्र, पोलिसांनी त्यांना नगरच्या सीमेवर सुपे टोलनाक्याजवळ रोखलं आणि ताब्यात घेतलं. तृप्ती देसाई सोबत कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सुपे पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यावेळी भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
देसाई म्हणाल्या,”साई संस्थानने महिलांच्या ड्रेसकोडबाबत लावलेला तो बोर्ड हटवण्यासाठी आम्ही शिर्डीला चाललो आहोत. याद्वारे आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न होत आहे. आमचा हक्क मिळवण्यासाठी आम्ही शिर्डीकडे निघालो आहोत. मात्र, पोलिसांनी आम्हाला नगरच्या आधीच अडवलं असून याद्वारे आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण पोलिसांनी कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही शिर्डीला जाणारच आहोत.”असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला. तृप्ती देसाई शिर्डीत येणार असल्याने ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्तेही तिथे पोहोचले आहेत. सीमेवरच त्यांना रोखू असा इशारा त्यांनी दिला होता.