ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भिवरवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार ; नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण

करमाळा (सोलापूर) : गेल्या दहा-बारा दिवसांपासून करमाळा तालुक्‍यात नरभक्षक बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे.  तालुक्यातील भिवरवाडी येथे आज पहाटेच्या सुमारास अनिल गोरख आरकिले यांच्या गोठ्यात बांधलेल्या गाय व वासरूवर बिबट्याने हल्ला करून वासरू फस्त केल्याची घटना घडली. बिबट्याने वासराच्या शरीराचा मागचा भाग बिबट्याने खाल्ला आहे, तर गायीच्या मानेवर व गळ्यावर बिबट्याने हल्ला केल्याच्या खुणा असून गाय बेशुद्ध पडली आहे.  या घटनेमुळे शेतकरी व मजुरांमध्ये बिबट्याविषयीची  दहशत कायम आहे.

करमाळा तालुक्यात तीन बळी घेणाऱ्या बिबट्याला मारायचे सर्व प्रयत्न फेल गेल्याने बिबट्याचे वास्तव्य आलेल्या सांगवी, बिटरगाव व भिवरवाडी परिसरात मोठी दहशत पसरली आहे.  बिबट्याला माणसावर हल्ला करणे शक्‍य न झाल्याने वांगी (भिवरवाडी) भागातील बिबट्याने अखेर गाय व वासरावर हल्ला करून आपली भूक भागवली असून, बिबट्याला मारण्यात वनविभागाला यश मिळत नसल्याने आणखी किती बळी हवे आहेत, असा संतप्त सवाल लोकांमधून उपस्थित केला जात आहे.

सोमवारी (ता. 14) पहाटे भिवरवाडी येथील गोरख आरकिले यांच्या वस्तीवर बिबट्याने एका गाय व वासरावर हल्ला केला. यामध्ये या दोन्ही प्राण्यांच्या नरड्याच्या भागावर चावा घेऊन प्रथम त्यांना मारण्याचा प्रयत्न केला व नंतर लहान वासराचा फडशा पाडला. माणसाच्या रक्ताला चटावलेल्या बिबट्याने सात – आठ दिवसांत माणसाची शिकार न मिळाल्याने दुधाची तहान ताकावर भागवली असली, तरी लोकांच्या मनात त्याची भीती कायम आहे.

वांगी परिसर त्याच्या भीतीने पुरता हादरून गेला आहे. रविवारी (ता. 13) ढोकरी हद्दीतील भानुदास सलगर यांच्या शेतात बिबट्या खात्रीने आहे, असे लोक सांगत असतानाही वनविभाग व संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केले. आणखी एखाद्या नागरिकाचा बळी घेतल्यावर वनविभाग व इतर यंत्रणा जागी होणार का, असाही प्रश्न लोक विचारत आहेत. बिबट्याच्या शोध घ्यायला व त्याला ठार मारणे वन विभागाला शक्‍य नाही का? त्यांना त्याला मारायचे नाही का? असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता मात्र लोकांचा संयम सुटत चालला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!