मुंबई : महाराष्ट्रात अघोषित आणीबाणीसारखं वातावरण आहे, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. दरम्यान, या वक्तव्याचा शिवसेनेचे संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांनाच महाराष्ट्रात आणीबाणी लागू व्हावी, असे वाटतंय. तशी परिस्थिती निर्माण करून फडणवीस यांना पुन्हा सत्तेत यायचे असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
‘भाजपलाच हुकूमशाही आणि आणीबाणी हवी आहे. तशी परिस्थिती निर्माण करुन फडणवीस यांना पुन्हा सत्तेत यायचं आहे,’ असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. ‘शिवसेनेला इंदिरा गांधी यांच्या काळातील आणीबाणीचा विसर पडलेला नाही. मोदी सरकारकडे बहुमत असले तरी लोकशाही व्यवस्थेत त्यांना विरोधी पक्षांचा आवाज ऐकावाच लागेल. लोकशाहीत विरोधकांना देशद्रोही ठरवणे हीदेखील एक प्रकारची आणीबाणी आहे,’ असा शब्दांत संजय राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.